नॅनो तंत्रज्ञानावर आधारित नॅनो युरियासारख्या खतामुळे नत्राची कार्यक्षमता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच पर्यावरणाची देखील कोणतीही हानी होणार नाही, यामुळे पारंपरिक युरियाला एक सक्षम पर्याय म्हणून नॅनो युरिया द्रवरूप शेतकऱ्यांच्या आणि जमिनीच्या, दोघांचाही फायद्याचा ठरेल, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
इफको नॅनो युरियाच्या शेतकरी जागृती मोहिमेच्या व्हॅनचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सातारा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन आणि इफको आर.जी.बी. सभासद गणपतराव शिंदे , सहाय्यक क्षेत्र प्रबंधक इफको सातारा संदीप रोकडे, संघाचे संचालक हनमंतराव चव्हाण, विलासराव नलावडे, सुशांत माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक कदम, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते.
रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा समतोल वापर करून जमिनीचे आरोग्य शाश्वत ठेवण्याचे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले. संदीप रोकडे यांनी जगातील पहिले नॅनो तंत्रज्ञानावर आधारित नॅनो युरिया द्रवरूप आणि पारंपारिक युरिया यामधील फरक शेतकऱ्यांना समजावून सांगितला.
पारंपारिक युरियाचे जमिनीमध्ये विघटन होत असताना अमोनिया आणि नायट्रस ऑक्साईड यासारखे हवेचे प्रदूषण करणारे वायू हवेमध्ये मिसळतात. तसेच युरिया विरघळल्यानंतर तयार झालेले नाइट्रेट जास्तीच्या पाण्यासोबत वाहून जाऊन पिण्याच्या पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित करतात. अशाप्रकारे पारंपारिक युरियाची कार्यक्षमता फक्त ३० टक्के पर्यंतच असते. याउलट नॅनो युरियाचा वापर केल्याने नत्राचे नॅनो कण पिकाच्या पानांमार्फत शोषली जातात आणि पानांच्या पेशींच्या पोकळीमध्ये साठवले जातात. हे नत्राचे अतिसुक्ष्म नॅनो आकारांच्या कणांचे पिकाच्या गरजेनुसार रूपांतर नायट्रेट मध्ये होऊन नत्र पिकाला उपलब्ध होते. पिकाच्या आतमध्ये विघटन झाल्यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता तिप्पट म्हणजेच ९० टक्क्यांपर्यंत वाढते. तसेच हवा आणि पाणी यामध्ये कोणतेही नत्राचे घटक न मिसळल्यामुळे हवा, जमीन आणि पाणी यांचे कोणतेही प्रदूषण होत नाही. नॅनो युरिया हा हाताळण्यास आणि वापरण्यास सोपा तसेच पारंपारिक युरियापेक्षा दहा टक्के कमी किमतीमध्ये मिळतो ही माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. या व्हॅन मार्फत नॅनो युरियाबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती मोहीम पार पडणार आहे.Attachments area