महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / मायणी :
या उपक्रमामुळे लोकांच्या मनातील भितीच वातावरण नक्कीच कमी होईल
गेल्या पाच-सात महिन्यापासून कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत .दरवर्षी जून महिना आला कि विद्यार्थ्यांना नवे दप्तर,नवे कपडे, नवनवीन वह्या, पुस्तके याचे वेध लागतात.नवे मित्र,नवी शाळा यामुळे ते आनंदून जातात.मात्र यावर्षी
लॉकडाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरातच बसावे लागले . यावर उपाय म्हणून शासनामार्फत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण सुरू झाले .
मात्र ग्रामीण भागामध्ये पालकांना मोबाईल, इंटरनेट इत्यादी सुविधांचा अभाव आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खोळंबा होऊन बसलेला आहे. अशावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे म्हणून शिक्षक धडपडत आहेत.यापैकीच मायणी तालुका खटाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षिका वैशाली गोपाळ कांबळे यांनी नव्यानेच पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून अध्यापन सुरू केले आहे.या मुलांना भेटणे त्यांना आनंदमय गोष्टी सांगून अभ्यासक्रमाची गोडी लावण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत सुरू आहे.
पहिलीची मुले म्हणजे शिक्षण क्षेत्रात त्यांचं पहिलं पाऊल असतं. त्यांच्यामध्ये शाळेबद्दल खूप मोठीओढ आणि उत्सुकता असते .यावर्षी मात्र शाळा सुरू न झाल्याने त्यांची निराशा झाली. ही निराशा दूर करून त्यांचा शाळा,शिक्षक व शिक्षणाबद्दल सुसंवाद रहावा, यासाठी या शिक्षिका धडपडत आहेत. त्यांच्या या भेटीमुळे यांच्या वर्गात नाव्याने दाखल झालेली मुले व पालकही आनंदून जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी प्रत्येक सामान्य पालकांनी व मुलांनी हात धुणे, मास्कचा वापर करणे ,सामाजिक अंतर बाळगणे .आहारविषयक काळजी घेणे इत्यादी बाबतीत माहिती देऊन त्या उद्बोधन ही करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे परिसरातून व पालकांकडून कौतुक होत आहे.