वाई येथील औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांचा यंत्रणेत अडकल्याने मृत्यू झाला. सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. छाया संतोष बोधे (वय ३८ वर्षे) असे मृत कामगारांचे नाव आहे.त्या मागील सहा वर्षांपासून गरवारे टेक्निकल फायबर्स या कंपनीत नेट प्रोसेस विभागात काम करीत आहेत. आज फर्स्ट शिपसाठी सकाळी सात वाजता त्या कामावर गेल्या. यावेळी रोप वेचे काम करीत असताना त्याचा पाय अडकल्याने त्यांचे संपूर्ण शरीर वेगाने दोरीसोबत गुंडाळले गेले. यावेळी कामावर असलेल्या अन्य कामगारांनी त्वरित मशीन बंद केले. दरम्यान त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तातडीने वाईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिचे पती संतोष तान्याबा बोधे हे देखील कंपनीत हाऊस किपिंगचे विभागात काम करीत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या घटनेची नोंद वाई पोलिसात झाली आहे.