पाटण येथील आयोजित जनता दरबारला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून त्यांनी दिलेल्या निवेदनांवर तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर तसेच धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर शासनास प्रस्ताव पाठवून सोडविण्यात येईल. राज्य शासन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
पाटण विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या अडीअडचणी जाग्यावर सोडविण्यासाठी पाटण तहसिल कार्यालयात गृह(ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाडे, तहसिलदार आर. सी. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार, यशराज देसाई यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना संसर्गामुळे जनता दरबार घेता आला नाही. आजच्या जनता दरबारात 175 नागरिकांनी नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लेखी निवेदने द्यावीत. त्यांच्या कामांचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी पोलीस अधिक्षक श्री. बन्सल म्हणाले, जनता दरबारचा उपक्रम अतिशय चांगला असून जनतेकडून आलेल्या निवेदनांवर सकारात्मक विचार केला जाईल व त्याचा जास्तीत जास्त निपटारा केला जाईल.
यावेळी महाराजस्व अभियानाअंतर्गत शिधापत्रिका, सानुग्रह अनुदान, सात-बाराचे वाटप तसेच कातकरी समाजातील नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप श्री. देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.