महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. २९ मार्च : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन ही संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ”महाराष्ट्र केसरी ” या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.१९५३ साली हे अधिवेशन सुरु झाले. १९५३,१९५५,१९५८,१९५९ अधिवेशने रद्दच झाली होती.१९६० साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्णीत झाल्या. मात्र १९६१ साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र केसरीचा श्रीगणेशा करणाऱ्या ठरल्या.औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकूण २६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यातून ५५० मल्ल सहभागी झाले होते.मानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी ५ सिंह झुंजणार होते. नागपूरचे राम अग्यारी, मिरजेचे बापू बेलदार, कोल्हापूर ( मुळचे जि. सांगली, गाव – दह्यारी, ता. तासगाव आत्ताचे पलूस) दिनकरराव दह्यारी.मुंबईचे बिरजू यादव आणि वसंत निगडे.वजने झाली आणि कुस्त्यांच्या फेऱ्या सुरु झाल्या.
पहिली फेरी होती दिनकर दह्यारी आणि नागपूरच्या राम अग्यारी यांच्यात.या फेरीत शाहूपुरी तालमीच्या उंच पुऱ्या आणि गोऱ्यापान दिनकर दह्यारी यांनी राम अग्यारी याला चीतपट करून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. दुसरी फेरी होती बिरजू यादव आणि बापू बेलदार.मिरजेच्या संस्थानाचा मल्ल अशी ख्याती असणारा बापू आणि बिरजू यांच्यात बिरजू वरचढ ठरत तो अंतिम साठी पुढे आला.पहिलीच महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार म्हणून मैदानाला अक्षरश: लोकांचा महापूर आला होता.कोण होणार पहिला महाराष्ट्र केसरी, अशी खुमासदार चर्चा सुरु होती. कुस्ती पंढरी म्हणून नावलौकिक असणारे कोल्हापूरचे दिनकर दह्यारी यांनी या गदेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली सर्वाना ठावूक होते. तर दुसरीकडे बिरजूने या गदेसाठी जीवाची बाजी लावली होती. मागच्या सर्व कुस्त्या अतिशय चटकदार करून तो अंतिम सामन्यात सहभागी झाला होता.आणि कुस्तीची शिट्टी वाजली ,सलामी झडली.दोन सिंह त्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या गदेसाठी अक्षरश एकमेकावर तुटून पडले.अखेर दिनकर दह्यारी यांनी जीवाची बाजी लावून पाटावर हल्ला चढवत पट काढून बिराजुला खाली धरून आणले ,जसे खाली धरून दोन्ही गुडघे मातीला टेकले तितक्याच चपळतेने घिस्सा मारून बिरजूला अस्मान दाखवले.पंचाने दिनकरराव जिंकल्याची शिट्टी जशी मारली तसा तो माणसांचा लोंढा मैदानात घुसला आणि दिनकर दह्यारी यांना उचलून घेऊन मैदानाला प्रदक्षिणा काढली. दिनकर (दह्यारी)पाटील यांचे वस्ताद स्वातंत्रवीर ज्ञानू जाधव (चौकीवाले) उर्फ वस्ताद आबा हे ही दह्यारी गावचे ! आपल्या गावच्या सुपुत्राने महाराष्ट्र केसरीची कुस्ती मारली या आनंदाप्रीत्यर्थ गावाने आणि आसपासच्या गावांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली.