
गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे स्व. चव्हाणसाहेब यांचा जयंती दिन साधेपणाने साजरा करण्यात आलेला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने व शासनाने जाहिर कार्यक्रमांवरील निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदाचा जयंतीदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, कारखाना सचलित सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑप.लि (इफको) यांच्या संयुक्त विद्यमाने 12 मार्च 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता अरण्या मंगल कार्यालय, उंब्रज-चरेगांव रोड उंब्रज येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. इफको पुणेचे विपणन प्रबंधक डॉ.एम.एस.पोवार हे ऊस उत्पादकता व खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.लक्ष्मी गायकवाड, सर्व संचालक, सातारा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कराड, खटाव, कोरेगांव व सातारा पंचायत समितीचे पदाधिकारी, कराड व रहिमतपूर नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान 12 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता कारखाना कार्यस्थळावरील स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी अभिवादन करण्यात येणार आहे.
उंब्रज येथील शेतकरी परिसंवादास सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन इफको संस्था, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले आहे.






















