महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. १० मार्च : सावित्रीबाई फुले या समाजाचा रोष पत्करून स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. भारतातील स्त्रीमुक्तीचं प्रतिक असलेल्या सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीतील महत्त्वाच्या व्यक्ती होत्या.सावित्रीबाई फुले यांनी जातीयता आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढा दिला. मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळ उभारली. कवयित्री असलेल्या सावित्रीबाईंनी समाजातील विषमता, भेदभाव, जातीय अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधात सातत्यानं आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लढा दिला. महिलांना शिक्षण मिळावं, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळावी, हक्क मिळावा यासाठी सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचा वारसा आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले.

पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सावित्रीबाईं फुले पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी साळुंखे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. वर्णे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



















