बारामती : बारामती तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कोऱ्हाळे बुद्रुक, ता.बारामती येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीने या वर्षी सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन वंदना भगत या होत्या. संस्थेच्या गोडाउन मध्ये ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी अजिंठा वरील सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन २०२०-२१ सालचे संस्थेचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे, २०२२-२३ या वर्षा करता सभासदांना लागणारे कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागण्याचा अधिकार पंच कमिटीस देणे, २०२१-२२ चा सरकारी तपासणी अहवाल वाचून दप्तरी दाखल करणे, सभासद यांच्याकडे असणारी ३०जून पर्यंतच्या थकबाकीच्या वसुली बाबत विचार करून वसुलीसाठी कडक निर्बंध राबवणे, व्यवस्थापक समितीने सन २०२०-२१ च्या केलेल्या नफा वाटणीस मान्यता देणे आदी सर्व विषयावर सभेमध्ये चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील तात्या भगत उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सिद्धेश्वर विकास सोसायटी तालुक्यात अग्रगण्य अशी सोसायटी असून चालू वर्षात संस्थेने १००० एकरावर सभासद शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले आहे. तसेच मागील महिन्यात ८ लाख ३१ हजार रुपये बँक व्याज परतावा सुद्धा सभासदांच्या नावावर वर्ग केला आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांने ही राज्यात उच्चांकी दर दिल्याने व वेळेत पैसे शेतकऱ्यांना मिळाल्याने सोसायटीचे कर्ज, मध्यम मुदतीचे हप्ते भरणे शेतकरी सभासदांना शक्य होत आहे. त्यामुळे संस्थेच्या वाटचालीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मोलाचा वाटा असल्याचे ही भगत यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव सुरेश भगत यांनी केले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा मंदाकिनी साळुंके, संस्थेचे मार्गदर्शक विलास भाऊ भगत, डी.जी. माळशिकारे, वडगाव चे सरपंच सुनील ढोले, पत्रकार सचिन वाघ,थोपटेवाडी चे उपसरपंच कल्याण गावडे, विठ्ठल भगत, विश्वास भगत, भाग्यवान मतकर, अरविंद घाटे, मारुती माळशिकारे, जनार्दन भगत, यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.