सातारा- जावली तालुक्यातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि अपेक्षेप्रमाणे त्या- त्या गावातील प्रश्न सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. आलेवाडी गावातही विविधप्रकारची विकासकामे मार्गी लावली असून आलेवाडी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
जावली तालुक्यातील आलेवाडी येथे आमदार फंडातून पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १२ लाख रुपये, बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरुमीकरण, खडीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सेस फंडातून ४ लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या विकासकामांचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, सरपंच मंगेश पवार यांच्यासह प्रतापगड साखर कारखान्याचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यात कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गावात मूलभूत सोयी सुविधा पुरवून असंख्य विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रत्येक गावाचा चेहरामोहरा बदलून विकासाच्या माध्यमातून सातारा- जावली मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ बनवू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.