महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. २५ मार्च : कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील महिला गृहपालने लाच घेतलेल्या प्रकरणात सातारा येथील
समाजकल्याण उपायुक्त नितीन उबाळे याची सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कसून चौकशी करण्यात आली असल्याची खात्रीलायकरित्या समजते.
याबाबत अधिक माहिती अशी, कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील महिला गृहपालने लाच घेतलेल्या प्रकरणात तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या जबाबामध्ये संशयित महिलेने वारंवार
समाजकल्याण उपायुक्त नितीन उबाळे यांना पैसे द्यावे लागतात, त्याशिवाय ते कोणत्याच कागदपत्रावर सहीच करत नसल्याचा खळबळजनक आरोप उबाळे यांच्यावर केलेला आहे. सदर तक्रारदार महिलेच्या जबाबावरून या लाच प्रकरणातील संशयाची सुई ही
समाजकल्याण उपायुक्त उबाळे यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे. तक्रारदार व संशयित महिलांच्या जबाबावरून या लाच प्रकरणाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून उबाळे यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक शिर्के यांनी सांगितले.



















