सातारा : छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 6 वे प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी युक्तिवादाचे अवलोकन करून निर्णय दिला.
सरकार पक्षाने 14 दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. यावेळी तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलले. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्यावतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.
सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर आज सातारा न्यायालयात हजर केले. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबतच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी मुंबईतून ताब्यात घेतलं होते.