नियमित मुख्याधिकारी नसल्यानेच पाणी पुरवठ्याचा बोजवारा.
लोणंद, दि.२९/ प्रतिनिधी
लोणंद येथे पालखीसोहळा येण्यापूर्वीच प्रशासनाकडून महिनाभर आधीपासूनच जय्यत तयारी करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्याच्याचमुळे लाखो भाविक असूनही पोलिस दल आणि आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांना दर्जेदार सेवा पुरवण्यात आली.
सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभारी बंदोबस्त अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे तसेच सहाय्यक बंदोबस्त अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांनी पूर्वनियोजन करत वाहतूक व्यवस्था चोख ठेवली. लोणंदमधे दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या वाहनांचा अतिरिक्त तान पडणार नाही यासाठी लोणंदच्या चहूबाजूंनी पार्किंगची सोय करून कुठेही वाहतुकीस अडथळा येणार नाही यासाठी नियोजन केले. तसेच पुर्ण शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने खिसेकापू ,पाकीटमार यांना मोठ्याप्रमाणात आळा घातला. याच बरोबरीने जिल्हा आरोग्य विभागानेही वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी शहरात जागोजागी कॅम्प उभारल्याने कुठेच अतिरिक्त गर्दी वाढणार नाही याची काळजी घेतली.
लोणंद शहरात दोन वर्षांच्या खंडानंतर येत असलेल्या पालखी सोहळ्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून योग्य नियोजन करण्याची आवश्यकता होती मात्र हंगामी मुख्याधिकारी असलेल्या लोणंदच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत पुरेशी काळजी न घेतल्याने वारकऱ्यांसह लोणंदकरांनाही काल पासूनच पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी लोणंदला नियमित मुख्याधिकारी असण्याची गरज या ढिसाळ कारभारामुळे अधोरेखीत झाली. लोणंदसाठी नियमित मुख्याधिकारी नसल्यानेच पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाल्याचा आरोप लोणंदकर करत आहेत.