श्री. यशेंद्र क्षीरसागर ( जिल्हा परिषद, सातारा)
लेखाच्या मध्यभागी दिलेल्या २२ सूचना अवश्य पहा आणि आपले कुटुंब तसेच सार्वजनिक जीवनामध्ये तसा कृपया अवलंब करा.
2021 च्या मे महिन्याच्या मध्याकडे जात असतानाच सातारा जिल्ह्यात पंचेचाळीस वर्षे वयावरील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 18 ते 44 वयामधील नागरिकांचे लसीकरण सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे लसीकरण करण्याचा विचार होऊ शकतो.कोरोनाचे रुग्ण पुन्हा दिसत असले तरी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये .मास्क, सामाजिक अंतर ठेवणे गर्दी न करणे , वारंवार हात धुणे या महत्वाच्या सवयी कायम ठेवाव्यात. तसेच पूर्वीचेच गांभीर्य कायम ठेवावे अशी जिल्ह्यातील नागरिकांना कळकळीची विनंती आहे . दंड ठोठावण्याची अथवा शिक्षा करण्याची वेळ येण्याअगोदरच सामाजिक जबाबदारी म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे मनापासून वाटते. जिल्हा परिषद तसेच ;इतर स्थानिक स्वराज्य संस्था, संपूर्ण महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग इत्यादी सर्व विभाग प्राणपणाने कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहे .स्वतः नियम पाळणे, त्यासोबतच स्वतः आपल्या बांधवांमध्ये प्रबोधन करणे हे जणू देशकार्य आहे. रूग्ण शोधणे, उपचार करणे यासोबतच विविध पातळ्यांवर प्रबोधन करणे हे काम सुद्धा प्रशासन सर्व बाजूंनी काटेकोरपणे आणि तळमळीने करीत आहे.त्याला जनतेची साथ गरजेची आहे. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक तसेच ;इतर सर्व संबंधित कर्मचारी रात्रंदिवस विषाणू नियंत्रणासाठी राबत आहेत .आपण नेहमी “कोरोना काळ” म्हणतो.परंतु त्याला आपण ‘संघर्ष काळ’ किंवा ‘मानवता काळ’ असे म्हणूया..!!आपण कोरोना बरोबर खूप छान मुकाबला केला आहे,आणि करीत आहोत.दुसरी लाट येणार आणि त्याच्याशी आपण समर्थपणे मुकाबला करणार आहोतच; असे म्हणत असताना त्या ऐवजी दुसरी लाट येऊच देणार नाही,असा निर्धार करणे गरजेचे आहे.सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते ।अशी आपली सुंदर भक्ती आणि सेवेची परंपरा आहे . बदलती आरोग्यमय जीवनशैली आपण विसरून उपयोग नाही…कोरोना काळात शिकलेल्या सूचना कायम जीवनशैलीचा भाग म्हणून अमलात आणाव्यात. मार्च २०२० पासून सर्व प्रकारचे कोरोना योद्धे रात्रंदिवस समाजासाठी झटत आहे.आता गाफील न राहता सगळे नियम पाळण्याची कसोशीने गरज आहे.कोरोनावर मात करण्यासाठी, ८ ऑक्टोबर दोन हजार वीस पासून, केंद्र सरकारने प्रबोधनासाठी; “जनचेतना” ही सुंदर मोहीम सुरू केली आहे. ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे l शहाणे करून सोडावे, सकळ जन ll’, या संतांच्या उक्तीप्रमाणे आज प्रबोधनाची नितांत गरज आहे.सर्वच पातळ्यांवर महत्त्वाचे प्रयत्न चालू आहेत.६ ऑक्टोबर २०२० रोजी आयुष मंत्रालयाने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या.त्यानुसार सरसकट सर्वच नागरिकांनी रोज दहा ग्रॅम च्यवनप्राश खाणे, तसेच “अश्वगंधा गोळी” सकाळ संध्याकाळ असे पंधरा दिवस सेवन करणे आवश्यक आहे .तसेच; जे कोरोना झाल्यानंतर मुक्त झाले आहेत, त्यांनी “आयुष- ६४”गोळी पंधरा दिवस खाणे महत्त्वाचे आहे…हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे सर्वच पातळ्यांवर मनापासून प्रयत्न चालू आहेत . “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हा सुंदर उपक्रम सरकारने सुरू केला आहे.त्याला जनतेने सहकार्य करणे,अत्यंत आवश्यक आहे.जीव धोक्यात घालून सेवाभावाने कर्मचारी आणि स्वयंसेवक घरोघरी सर्वे करत आहेत .रुग्ण जरी वाढत असले तरीही ,बरे होण्याची टक्केवारी वाढत आहे .प्रशासकीय पातळीवर आपण कोरोनाशी एकजुटीने लढत आहोत.अनेक बंधू-भगिनी मुक्त होत आहेत . घरच्या घरी बरे होणारी रुग्ण हजारोच्या संख्येत आहेत यासाठी काय काळजी घ्यावी यासंदर्भात प्रशासनाने सविस्तर नियम जाहीर केले आहेत अशा वेळेला चहूबाजूंनी जागरुकता बाळगणे, नागरिकांचे कर्तव्य ठरत आहे.प्रशासनाने घालून दिलेले, शासनाने सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहेच; परंतु त्यासोबतच काही सामाजिक वाईट तत्त्वे बाजूला ठेवली पाहिजेत. कानावर येणारे तसेच; समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या गोष्टी खर्या नसतात.तार्किक दृष्टीने आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या, शासनाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आज कुटुंबात, समाजात सकारात्मक वातावरण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. गाफील राहिले तर, दुसरी लाट येऊ शकते: असे सिद्ध होत आहे.सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे ही यशाची आणि सुरक्षेची त्रिसूत्री ठरली आहे. प्रत्येक गावात ग्राम समिती आहे.त्या ग्राम समितीला गावकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे तसेच जे बाधित आहेत, त्यांना गावकऱ्यांनी चांगली वागणूक देणे आवश्यक आहे.सकारात्मक राहणे गरजेचे आहे.काटेकोर निर्बंध पाळावेत गाफील राहू नये.विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही.पूर्वीप्रमाणेच सर्व वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. वारंवार हात धुणे, चेहर्याला वारंवार स्पर्श न करणे, अत्यावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडणे, मास्क वापरणे, कोणत्याही जागेत थुंकू नये,हस्तांदोलन न करता लांबूनच हात जोडून नमस्कार करणे अशा सर्वच गोष्टी पूर्वीप्रमाणेच पाळाव्यात .वारंवार हात धुण्याचा आणि मास्क वापरण्याचा कंटाळा करू नये.कार्यालयीन तसेच; इतर कर्मचाऱ्यांनी आणि सर्वच नागरिकांनी, घरी गेल्यावर विशेष काळजी घ्यावी आणि सर्व आवश्यक त्या गोष्टी पाळाव्यात . आपल्या आयुर्वेदिक मंत्रालयाने सुचविलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत : १) हळद टाकून गरम पाणी गुळण्या करणे.यालाच; ” गोल्डन वॉटर” म्हणतात.२) हळद आणि सुंठ टाकून गरम दूध पिणे, यालाच; “गोल्डन मिल्क” म्हणतात.३) खोबरेल तेल किंवा तिळ तेल किंवा मोहरीचे तेल नाकात दोन थेंब सोडणे ४) दोन ते तीन मिनिटे खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंडात धरून नंतर थुंकणे आणि लगेच गरम पाण्याच्या गुळण्या करणे ५) रोज दहा ग्रॅम चवनप्राश खाणे ६)काळी मिरी, काळे मनुके, दालचिनी, सुंठ, तुळशीची पाने, गुळ हे सर्व दहा मिनिटे पाण्यात उकळावे आणि त्यातून तयार झालेला आयुर्वेदिक काढा प्राशन करणे ७) रोज नियमितपणे तीस मिनिटे योग्य मार्गदर्शन घेऊन योगासने , ध्यानधारणा ,प्राणायाम करणे ८) रोज एक “आवळा” कोणत्याही स्वरूपात खाणे.९) “आर्सेनिक अल्बम थर्टी” या गोळ्या सल्ल्यानुसार खाणे .१०) “संशमनी वटी”, या गोळ्या रोज सकाळी संध्याकाळी एक- एक अशा पद्धतीने पंधरा दिवस सल्ल्यानुसार खाणे ११) बाहेरचे अन्न अजिबात न खाता घरात शिजवलेला पौष्टिक गरम आहार घ्यावा.१२) वारंवार गरम पाणी पिणे, तसेच ;गरम पाण्याची वाफ घ्यावी.१३) मास्क वापरणे, सामाजिक अंतर आणि वारंवार हात धुणे.१४) जेवण करीत असताना ,कमीत कमी बोलणे.१५) अश्वगंधा गोळी रोज सकाळ- संध्याकाळ असे पंधरा दिवस खाणे.१६) वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता कटाक्षाने पाळावी.१७) सुशिक्षित नागरिकांनी जनप्रबोधन करणे. १८) ग्राम सुरक्षा समिती तसेच ;शहरांमधून प्रभाग समिती यांना सहकार्य करणे. १९) सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.२०) रस्त्यावर थुंकू नये.२१) लहान मुले ,ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी.२२) कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा….ही आता जीवनशैली व्हायला हवी. गावोगावी ग्राम समिती तसेच शहरातून वेगवेगळे प्रभाग विलगीकरणसाठी कष्ट घेत आहेत . विलगीकरण प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे .बाहेरून आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवावी आणि आपले कर्तव्य बजावावे.”स्वच्छता” सर्वप्रकारे सर्व ठिकाणी पाळणे ;हा तर आपला रोजचा मूलमंत्र बनला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे संस्कार असलेला आपला समाज आहे.म्हणूनच स्वच्छता हा आपला “जीवितधर्म” बनवावा.जेणेकरून संसर्ग रोखला जाईल.विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट झालेला नाही.साखळी पूर्णपणे तुटलेली नाही.परस्परातील मतभेद विसरून सर्वांनी मिळून मुकाबला करणे गरजेचे आहे.प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर हे जणू “एक राष्ट्र” बनणार आहे. बाधित झालेले आणि त्यानंतर बरे झालेले तसेच ;संपर्कात येऊन अथवा प्रवास करुन विलगीकरण असलेल्या नागरिकांशी अत्यंत आपुलकीने वागणे गरजेचे आहे. मनाचा संकुचितपणा: माझे घर ,माझी गल्ली आणि फक्त माझा गाव असा विचार अत्यंत धोक्याचा ठरणार आहे.संत ज्ञानेश्वर माउलींनी ” हे विश्वची माझे घर “असा एकात्म संस्कार महाराष्ट्रावर केला आहे, हे आपण विसरता कामा नये. “मला काय त्याचे”, अशी बेफिकीर वृत्ती असणे बरोबर नाही. आपल्या राज्यात गावोगावी ज्ञानेश्वरीचे पारायण होते. तुकोबांच्या अभंगाची तर सुभाषिते झाली आहेत…हे सर्व लक्षात घेता आता एकमेकांसाठी झटणे ,गावाचा विचार करणे गरजेचे बनले आहे.आरोग्य ,पोलीस, महसूल प्रशासनाला ,अंगणवाडी सेविका ,आशाताई ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य केंद्रांमधील सर्व सहकारी, पोलीस जीवावर उदार होऊन, प्रत्यक्ष समाजात जाऊन; घरोघरी जाऊन काम करीत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी अशा जबाबदार अधिकार्यांपासून ते तळागाळातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण अत्यंत तळमळीने समाजासाठी झटत आहेत.कार्यालयातून काम करणारे कर्मचारी ,तसेच; सामाजिक काम करणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते इतकेच नव्हे तर; पत्रकार बंधू सुद्धा जीवावर उदार होऊन स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत .”ग्राम समिती” आणि शहरातील “प्रभाग समिती” यांना सर्व बाबतीत सहकार्य करावे. फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांचा वापर अत्यंत सकारात्मक आणि प्रबोधनासाठी करावा.कलाकार, लेखक ,गायक, विविध प्रकारचे तंत्रज्ञ इत्यादी जबाबदार घटकांनी आपल्या कलेचा वापर, सर्व नियम पाळून ;समाजात जागृती साठी करावा. गावोगावी सरकार तर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला प्रतिसाद द्यावा. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की; सुशिक्षित नागरिक, तसेच; शिक्षण घेत असलेले तरुण-तरुणी तसेच; इतर जागरूक यांनी नियंत्रण करण्याचे सर्व नियम स्वतः जाणून घ्यावेत आणि त्याचा आपल्या कमी शिकलेल्या ,कामगार इत्यादी बंधूंपर्यंत प्रसार करावा. दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वृद्ध, लहान मुले इत्यादी घटकांची विशेष काळजी घ्यावी.हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे. आपण गेले सहा महिने प्राणपणाने मुकाबला करीत आहोत.आपण मुक्त होणार आहोत . संपूर्णपणे काळजी घेत असताना दारू, सिगारेट ,तंबाखू अशा व्यसनांपासून सुद्धा पण दूर राहिले पाहिजे.एकंदरीतच ; आपुलकी ,मानवता, शासन, प्रशासनाबद्दलचा आदर, आपल्या देशबांधवांवरील प्रेम आणि त्यांना केलेले जीवापाड सहकार्य, या सर्व मुल्यांचा अवलंब करून या महासंकटावर आपण मात करू या…. व्यक्तिगत तसेच कौटुंबिक काळजी घेणे आणि राष्ट्रीय कर्तव्य समजून समाजाचा विचार करणे, तसेच ;ज्या गोष्टी आपल्याला माहित आहेत, त्या त्या चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे; या गोष्टी केल्या तर, आपण २०२१ हे वर्ष “कोरोनामुक्तीचे वर्ष” म्हणून साजरे करणार आहोत, हे निश्चित..!