‘श्रीराम’ वगळता इतर कारखान्यांचे दराबाबत मौन: शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था
फलटण तालुक्यामध्ये मागील महिन्याभरापासून चार कारखान्याच्या माध्यमातून गळीत हंगाम २०२०/२१ चे जोमात गाळप सुरू आहे. मात्र फलटणच्या श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखाना वगळता इतर तीनही कारखान्यांनी ऊस दराबाबत मौन बाळगले आहे. श्रीराम कारखान्यानी गाळपास आलेल्या ऊसाला १५ नोव्हेंबर अखेर रुपये २५९२ प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले आहेत. मात्र तालुक्यात कापशी येथील शरयू ऍग्रो, उपळवे येथील स्वराज ऍग्रो, व साखरवाडी येथील श्री दत्त या तीनही खासगी कारखान्यांनी महिन्याभरापासून गाळपास आलेल्या उसाची किती व कधी एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार? याबाबत मौन बाळगले आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या मनात आपल्या उसाला किती दर मिळणार आहे याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गतवर्षी मुबलक पाऊस पडल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे.
यामुळे शेतकरी वर्ग रब्बीच्या पेरण्या करण्यासाठी आपला ऊस कसा पटकन जाईल याकडे लक्ष देऊन आहे. त्यामुळे येईल त्या कारखान्याला शेतकरी आपला ऊस देत आहे. जसा कारखान्याचा गळीत हंगाम जास्त काळ लांबेल तसं ऊसतोड मजूर वर्ग शेतकऱ्यांकडेपैशांची मागणी करायला सुरुवात करतो. हा दरवर्षीचा अनुभव आहे .
यामुळे आपला ऊस वेळेत जाऊन गहू, हरभरा,व मका ही पिके होतील. या आशेने शेतकरी आपला ऊस नेईल त्या कारखान्याला देत आहेत.मात्र याच गोष्टीचा फायदा घेऊन कारखानदार दर जाहीर करायला टाळाटाळ करत आहेत काय ?असा सवाल शेतकरी खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.






















