महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड व पाटण तालुक्यातील पाल, तारळे व उरूल येथे सुमारे 4 कोटी 25 लक्ष खर्चाच्या ज्यादा शक्तीचे ट्रान्सफार्मर मंजूर झाले आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील वीजेची अनियमितता दूर होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील महावितरणच्या उंब्रज उपविभाग अंतर्गत 30/11 केव्ही पाल उपकेंद्र, तारळे उपकेंद्र आणि उरूल उपकेंद्र येथे शासनाच्या कृषी धोरण 2020 अंतर्गत जिल्हा कृषी आकस्मिक निधी मधून प्रत्येकी 5 एम. व्ही. ए. ज्यादा शक्तीचे ट्रान्सफॉर्मर मंजूर झालेले आहेत. सदर कामासाठी 4 कोटी 25 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित असून तो निधी मंजूर आहे. यासाठी उर्जा मंत्री नितीन राऊत, मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता बुंदीले, उप अभियंता चेतन कुंभार यांचे सहकार्य लाभले आहे. अशी माहीती खा.पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. यासंदर्भात खा.श्रीनिवास पाटील यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या उपकेंद्रातील कमी क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमुळे प्रामुख्याने शेतकरीवर्गाला सातत्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. परिणामी शेतक-यांना भारनियमनाला सामोरे जावे लागल्याने त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता ज्यादा क्षमतेचे ट्रान्सफार्मर मंजूर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच श्री खंडोबा देवस्थान असलेल्या पाल व दुर्गम भागातील तारळे व उरूल विभागातील अनेक गावातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांची खंडीत होण्या-या वीज पुरवठ्यातून सुटका होणार आहे.






















