लोणंद प्रतिनिधी/
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोणंद येथील मराठा नागरी पतसंस्थेच्या भव्य व सर्व सोयीसुविधांनी युक्त नुतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना अजितदादा पवार यांनी बोलताना डॉक्टर अनिलराजे निंबाळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या लोणंदच्या ‘मराठा नागरी पतसंस्थेने ‘ लोणंदच्या वैभवात भर घालेल अशी देखणी इमारत ऊभी केल्याचे उद्गार काढले तसेच संस्था काढणे सोपे असते मात्र ती यशस्वीरीत्या चालवणे , नावारूपास आणणे आणि जनतेच्या मनात तिच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करणे खूप मोठे काम असते ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिलराजे निंबाळकर यांनी यशस्वी करून दाखवले असल्याचे सांगितले. तसेच मराठा पतसंस्थेकडून मागील २९ वर्षांच्या काळात लोणंदकरांसाठी ऊद्योग ,व्यवसाय, कष्टकरी, शेतकरी , उद्योजक, छोटे व्यवसायीक यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करीत लोणंदच्या विकासात योगदान देत आहेत ते असेच यापुढील काळातही देत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पुढे बोलताना ना अजित पवार म्हणाले कोरोनाच्या काळात डॉक्टर व पोलीसानी खुप चांगले काम राज्यात केले आहे, महाराष्ट्रात जातीय सलोखा राखला जाऊन महाराष्ट्र एक राहिला पाहिजे,जातीय द्वेष महाराष्ट्राला कदापी परवडणारा नाही, दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याची गरज नाही ज्याला म्हणायची त्याने आपल्या घरात म्हणावी, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणाऱ्याना कायदा दाखवावाच लागतो, कोणीही सरकारला अल्टीमेटम देण्याचा प्रयत्न करु नये, सरकार कायदाने काम करणार आहे. प्रसिद्धीसाठी शरद पवार साहेबावर टिका करण्याचे काम काही लोक करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तर बाळासाहेब पाटील म्हणाले नियमीत कर्ज भरणाऱ्याना सरकार लवकरच मदत करणार असुन खंडाळा व किसनवीर हे साखर कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आगामी काळात लागेल ते सहकार्य करणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार , विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार व पननमंत्री बाळासाहेब पाटील, वाई ,महाबळेश्वर, खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील , जिप अध्यक्ष उदय कबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार दशरथ काळे, डाॅक्टर नितीन सावंत, लोणंदच्या नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, तसेच लोणंदचे नगरसेवक, नगरसेविका तसेच खंडाळा फलटण तालुक्यातील अनेक मान्यवर आणि संस्थेचे संचालक व सभासद उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हणमंतराव यादव,संजय मोकाशी,विजयकुमार जाधव, चंद्रकांत जगताप,राजेश शिंदे,महेंद्र यादव,सचिन चव्हाण, सुरेखा भोईटे, मंदाकिनी शिंदे, गिरीश रावळ,डॉ. गणेश दाणी, संस्थेच्या सचिव मनिषा भोसले उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिलराजे निबांळकर यांनी केले तर स्वागत डॉ किशोर शिंदे यांनी केले. डॉ दयाराम सुर्यवंशी यांनी आभार मानले.




















