लोणंदच्या कचरा डेपोच्या आगीत मशिनरी भस्मसात
लोणंद, दि,२३/ प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायतीच्या निंबोडी रोडवरील कचरा डेपोस लागलेल्या आगीत मशनरी जळून मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
लोणंद येथील निंबोडी रोडवर माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्या जागेमध्ये नगरपंचायतीचा ओला व सुका कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कचरा डेपोस रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पणे आग लागली. या आगीमध्ये ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नगरपंचायत व संबधीत ठेकेदाराच्या मशीनरी जळुन नुकसान झाले. तर सुक्या कचऱ्यापासुन बनविलेल्या मालाचेही मोठे नुकसान झाले.
कचरा डेपोस लागलेल्या आगीत सुमारे 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असुन कचरा डेपोस लागली की लावण्यात आली या बाबत तर्क वितर्क वर्तवण्यात येत आहेत.
संबधीत ठेकेदाराचा कचरा प्रक्रियेचा करार नुकताच संपलाअसून सध्या घंटागाडी मधुन जमा करण्यात येणारा कचरा दुसऱ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात टाकण्यात येत आहे.या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यासच आग लागली . आग लागल्याचे समजताच नगराध्यक्ष मधुमती पलंगे- गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, नगरसेवक ,माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर, राजेंद्र डोईफोडे, संदीप शेळके, निलेश शेळके, हर्षवर्धन शेळके आदिंनी घटनास्थळी भेट दिली.