मतदार यादी देण्यास टाळाटाळ केल्याने कारवाही
पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेची मतदारयादी वारंवार मागवूनही ती देण्यास टाळाटाळ केल्याने जिल्हा उपनिबंधकांनी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबतची माहिती प्राथमिक शिक्षक समितीच्या संचालकांनी दिली . प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत . करोनामुळे लांबत गेलेली निवडणूक प्रक्रियाराज्य प्राधिकरणाच्या सचिवांच्या आदेशाने नुकतीच सुरू झाली आहे . जिल्हा उपनिबंधकांनी सातारच्या सहाय्यक निबंधकांना प्रारुप मतदारयादीसाठी नियुक्त केले . सहाय्यक निबंधकांनी १ एप्रिल रोजी पत्र पाठवून दोन दिवसांत मतदारयाद्या जमा करण्याचा आदेश शिक्षक बँकेला दिला होता ; परंतु बँकेने मतदारयादी अजून पाठवलेली नाही . यासंदर्भात शिक्षक समितीच्यावतीने आंदोलनाचे पत्र दिल्यानंतर सहाय्यक निबंधकांनीजिल्हा उपनिबंधकांना कळवले . दोन दिवसांत यादी देण्याचा आदेश असताना तब्बल दीड महिना यादी देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक ( सहकारी संस्था ) यांनी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे . यादी देण्यास झालेल्या विलंबाची कारणे लेखी मागितली आहेत , अशी माहिती समितीच्या संचालकांनीदिली . दरम्यान , जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधकांच्या आदेशाला विद्यमान चेअरमन व बँक व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे . यादी लवकर जमा न केल्यास शिक्षक बँकेसमोर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस व बँकेचेसंचालक किरण यादव , चंद्रकांत मोरे , सुभाष शेवाळे , शिवाजी शिंदे यांनी सांगितले .

चौकट-बँकेत दबावतंत्राचा वापर शिक्षक बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे . बँकेत पुन्हा सत्ता येण्याची खात्री नसल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी चेअरमन करत आहेत . सभासदांच्या हिताचा कारभार बँकेत होत नसल्याने विद्यमान चेअरमन व व्हाइस चेअरमन दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी केला आहे .






















