एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व प्रा.विजयराव पानस्कर
पाटण: प्रा. विजयकुमार पानस्कर हे नियत वयोमानानुसार दि. 31 मे 2022 रोजी महाविद्यालयाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत .कलंदर वृत्तीचे हरहुन्नरी सर्वच कामांमध्ये हिरीरीने भाग घेणारे सर्वांना हवेहवेसे वाटणारे मनमिळावू, दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे पानस्कर सर 1994 पासून त्यांनी बाळासाहेब देसाई महाविद्यालयांमध्ये आपल्या सेवेला प्रारंभ केला आणि आज 31 मे 2022 रोजी ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.
खरंतर मागे वळून पाहत असताना एक समाधानाने नोकरी करून ते निवृत्त होत आहेत. जसं ते आपल्या सहकाऱ्याच्यामध्ये प्रिय होते तसेच ते विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मध्येसुद्धा प्रिय होते . सरांच्या व्यक्तिमत्वात एक मोठा कलाकार दडलेला आहे ते उत्तम गायक आहेत तसेच उत्तम अभिनेताही आहेत. अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या गावात पारावरच्या नाटकांमध्ये सुद्धा कामे केलेली होती त्यांच्यातला हा कलाकार नोकरी करत असताना सतत दिसत राहायचा त्याला खरे व्यासपीठ मिळाले ते परिवर्तन विचारमंचाच्या माध्यमातून, लोकरंजनातून लोक प्रबोधन करणारी ही संस्था खेडोपाडी जावून अंधश्रद्धा, एड्स, व्यसनाधीनता, लोकसंख्या इ. विषयावर जाणीव जागृती व प्रबोधन करीत असे त्या संस्थेतून त्यांच्यातील कलाकाराला एक वाव मिळाला व्यसनमुक्तीचे भारूड असो किंवा कोणत्याही प्रकारचा अभिनय असो ते इतक्या समर्थपणे करायचे की प्रत्यक्षात त्या पात्रामध्ये त्या भूमिकेमध्ये ते स्वत ला झोकून देत असायचे व भूमिका रंगमंचावर जगत असायचे, व्यसनमुक्तीचे भारूड सादर करत असताना दारुड्यांची ते नक्कल इतके हुबेहूब करायचे की बऱ्याचदा समोरच्या प्रेक्षकांना वाटायचे की ते खरोखरच प्यायलेले आहेत की काय पण तसे काही नसायचे त्याचबरोबर त्यांना गाण्याची उत्तम जाण होती अतिशय तालबद्ध स्वरबद्ध ते भारूड सादर करत असायचे . सरांचा मित्रपरिवार ही खूप मोठा आहे यापूर्वी त्यांनी प्रवरानगर त्यानंतर कोकणात एक ,दोन ठिकाणी नोकरी केली होती तेथील त्यांचा मित्रपरिवार आज ही त्यांच्या संपर्कात आहे आणि बाळासाहेब देसाई कॉलेजमधील त्यांच्या प्रदीर्घ सेवेतील असणारा मित्रपरिवार ही खरे तर त्यांची खूप मोठी संपत्ती आहे . त्यांचा सहवास त्यांची मैत्री कुणालाही हवीहवीशी वाटणारी अशाच प्रकारची आहे. त्यांच्यासोबत कुठलाही माणूस कधी निराश किंवा कंटाळत नसे इतकं ते दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मध्येसुद्धा अगदी ते सहज मिसळून जायचे रंगून जायचे त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा विद्यार्थी वर्गसुद्धा तितक्याच संख्येने मोठा आहे मुलांचे अनेक प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असत , सहकाऱ्यांच्या सुख दुःखामध्ये अगदी हिरीरीने सहभाग घेत असत . त्याचबरोबर त्यांनी आपलं कुटूंब सुद्धा तितक्याच प्रेमानं जपलं.
त्यांचा मुलगा सुमीत एका चांगल्या आयटी कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे मुलगी इंजिनीयर असून ती सुद्धा नोकरी करते एकूण सर्व बाजूंनी त्यांनी आपले आयुष्य सुखी समृद्ध व संपन्न बनविलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ सुनिता पानस्कर यांची त्यांना खंबीरपणे आणि मोलाची साथ लाभलेली आहे. सर्व कुटुंब एकत्र ठेवण्यामध्ये त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे आज या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने पाठीमागे वळून पाहत असताना एक समृद्ध जीवन जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतो आहे कोणत्याही प्रकारच्या औषधाची गोळी न घेता सेवानिवृत्त होणे ही तर खरी त्यांची मोठी कमाई असलेली पाहायला मिळते त्यांचे भावी आयुष्य निरोगी व सुखसंपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थनाप्रा.डॉ. पांडुरंग ऐवळेमराठी विभाग प्रमुख,बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण