सह्याद्रि कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारासाठी कंत्राटदारांची गर्दी
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाची तोडणी व वाहतूक वेळेत होण्याच्यादृष्टीने पुरेशे ऊस तोडणी वाहतूकीचे संयुक्त करार करण्याचा शुभारंभ कारखान्याच्या संचालिका सौ.शारदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. 13 जून, 2022 रोजी कारखाना कार्यस्थळावर नुकताच संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सर्वच कारभार काटेकोरपणे सुरू आहे. ऊस तोडणी वाहतूकीची बिले वेळेत आदा केली जातात, व्यावसायिक लोकांना तुलनात्मक चांगले दर दिले जातात, त्यांनी केलेल्या श्रमाला योग्य दाम दिला जातो. कारखाना व्यवस्थापनाकडून ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना चांगले सहकार्य केले जाते, त्यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेतली जाते, सह्याद्रिशी केलेल्या करारामुळे ऊस वाहतूक कंत्राटदारांचा चांगला व्यवसाय होतो, जवळपास 7 महिने अखंड व खात्रीशीर रोजगार दिला जातो. कारखान्याबद्दलच्या विश्वासार्हतेमुळे परजिल्ह्यातील अनेक वाहनमालकांची सह्याद्रिकडे करार करण्याची चढाओढ लागलेली असते असे सांगून, गांवोगांवी स्थानिक ऊस तोडणीच्या यंत्रणा तयार व्हाव्यात, त्या माध्यमातून जनांवरांना ओला चारा उपलब्ध होवून, दुग्ध व्यवसायातूनही अर्थाजन होण्यास मदत हाईल. गांव पातळीवर ऊस तोडीच्या टोळ्या व वाहतूक यंत्रणा तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी कारखान्याच्या मुख्य शेती ऑफिसशी त्वरीत संपर्क साधावा तसेच येणारा सन 2022-23 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी योवेळी केले.
सह्याद्रि कारखान्याच्या सन 2022-23 हंगामासाठी करार करण्याची माहिती मिळताच, कराराच्या पहिल्याच दिवशी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी करार करण्यासाठी गर्दी केली होती.
ऊस तोडणी वाहतूक करारांच्या शुभारंभाप्रसंगी हिंदुराव यादव, अधिकराव पाटील, विश्वास थोरात, मंगेश उर्फ हणमंत पाटील, निवृत्ती जाधव, अभिजीत पाटील, आप्पासो भोसले, सुनील देवकर, बाळू फडताडे, आप्पा फडताडे, वाल्मीक कांदे, हौसेराव सूर्यवंशी, सुरज चव्हाण, कारखान्याचे चीफ अकाउंटंट जी.व्ही.पिसाळ, जनसंपर्क अधिकारी व्ही.जे.शेलार, शेती अधिकारी एम.ए.पाटील, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, डे.ऊस विकास अधिकारी एस.जी.चव्हाण, एम.के.साळुंखे, तसेच कर्मचारी उपस्थित होते.