लोणंद, दिनांक २२ :
आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे – वाघोशी रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात तरुणांकडून गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी दूपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर खळबळजनक घटनेत प्रसाद कोंडे यांच्यावर हल्लेखोरांकडून दोन गोळ्या झाडल्यानंतर सुरक्षा रक्षकाकडुन देखील अज्ञाताना भिती दाखवण्यासाठी प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेत सुदैवाने कसलीच जीवित हानी झालेली नाही.
मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे हे वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा येथील दर्शन घेऊन मोर्वे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या गाडीतून लोणंदच्या दिशेने जात असताना भादे गावचे हद्दीत सदर घटना घडली.
सदर घटनेची माहीती मिळताच खंडाळा , लोणंद आणि शिरवळ या तीनही पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सपोनि विशाल वायकर, पोउनि मोरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटना नक्की कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. घटनास्थळाला फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट देवुन पाहणी केली आहे.