महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. २ मे : छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासह महान विभूतींचा महाराष्ट्र आज ६२ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. १ मे, १९६० या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि जागतिक पातळीवर उच्चांकी कामगिरी करत असलेल्या भारत देशाच्या गौरवशाली वाटचालीत महाराष्ट्र योगदान देऊ लागला. पुरोगामी विचारांचा, महिला सबलीकरणाचा, स्वातंत्र्याला प्राधान्य देणारा, बालविकासाची चळवळ वेगाने पुढे नेणारा, न्याय- समता- बंधुता ही शिकवण कृतीतून पाळणारा आपला महाराष्ट्र गतीने पुढे जात सर्वांगीण प्रगती करीत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले. पांचगणी येथील महात्मा फुले विद्यामंदिर आणि श्रीमती कांताबेन महेता ज्युनिअर कॉलेजमध्ये १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य वाळवेकर बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य वाळवेकर आणि प्राध्यापक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयातील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणपत्रके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.






















