महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
मौजे शिरवडे ता. कराड या गावातील ब्रिटिश काळापासून अद्याप पर्यंत पिढ्यानपिढ्या वहिवाटीत असणारा शिरवडे – मसूर ग्रामीण मार्ग ३१८ हा सप्टेंबर २०२२ पासून गावातील एका व्यक्तीने बेकायदेशीर रित्या वाहतुकीसाठी पुर्णतः बंद केलेला आहे. याबाबत गावातील शेतकऱ्यांनी दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ रोजी तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, तळबीड पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत शिरवडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन रस्ता पूर्ववत खुला करण्याची मागणी केली.
परंतु आज पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. संबंधित सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख एकमेकांच्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत. सदरचा रस्ता हा शिरवडे गावच्या जुना सर्वे नंबरच्या नकाशावरती व गट नकाशा वरती दर्शविण्यात आलेला असून या रस्त्यासाठी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा वेगवेगळ्या माध्यमातून खडीकरण व डांबरीकरण अशा शासकीय निधीतून रस्त्याची कामे करण्यात आलेली आहेत. सदरचा रस्ता बंद झाल्यामुळे शिरवडे गावातील जवळपास 60% शेतकऱ्यांना प्रचंड नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला तोडी येऊनहि रस्ता बंद असल्यामुळे ऊस तोड घेता येत नाही. त्याचबरोबर बंद केलेल्या रस्त्याच्या पलीकडील बाजूस जवळपास शेकडो एकर शेती आहे. काही शेतकऱ्यांची शेतघरे, गुरांचे गोटे आहेत. शेतकऱ्यांना शेतीची दैनंदिन कामे करण्यास खूप त्रास होत आहे.
हा रस्ता खुला करण्यासाठी गावातील शेतकरी ग्रामस्थ ऑक्टोंबर २०२२ पासून संबंधित सर्व प्रशासकीय कार्यालयात सतत हेलपाटे मारत आहेत. परंतु यातील कोणीही या विषयाची गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाहीत.
म्हणून अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक २५ जानेवारी २०२३ पर्यंत सदर रस्ता पूर्ववत खुला करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
अन्यथा शिरवडे गावातील शेतकरी ग्रामस्थ यांना बरोबर घेऊन २६ जानेवारी २०२३ पासून शिरवडे – तासवडे या रस्त्यावरती शिवतीर्थ या ठिकाणी सदर रस्ता खुला होत नाही तोपर्यंत बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी निवेदनातून दिलेला आहे. यावेळी माजी सरपंच सर्जेराव थोरात, सरपंच अनिल जगदाळे, अशोक पवार, जयवंत थोरात, गणपती शिंदे, राजेंद्र जगदाळे, संजय पाटिल, ग्रा.पं. सदस्य महेश पवार, संजय जगदाळे, शहाजी पवार, सुभाष पवार, नंदकुमार घोलप, दिनकर मोहिते, सुहास जगदाळे, संजय जगदाळे, निलेश जगदाळे यासह मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थ उपस्थितीत होते.