सातारा
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण राज्यभर दौरा करणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे शनिवारी मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासोबत मराठा समन्वयकांची बैठक झाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केल्यानंतर सरकारला जाग आली त्यावेळी त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरू केले. तसेच काही ठिकाणी हे दाखले वाटपही सुरू झाले आहेत. सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत, यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे.
त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करून मराठा समाजात जागृती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात दौरा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा गुरुवारपासून सातारा जिल्ह्यात दौरा सुरू होणार असून त्यांची पहिली सभा खटाव तालुक्यातील मायणी येथे होणार आहे. दुसरी सभा १७ नोव्हेंबर शुक्रवारी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणार आहे. शुक्रवारी त्यांचा कराड येथे मुक्काम आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबर शनिवार रोजी मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहरात मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार आहे. शनिवारी सातारा, मेढा आणि वाईमध्ये सभा घेणार असल्याचा त्यांचा दौरा जाहीर झाला होता.
सातारामध्ये सभा होणार का याबाबत बरेच दिवस संभ्रम होता. सभेच्या नियोजनावरून समन्वयकांमध्ये संभ्रम असल्याने साताऱ्यात बैठक झाली होती. त्यानंतर शनिवार ऐवजी डिसेंबरमध्ये सभा घेण्यात येणार असल्याचे काही समन्वयकांकडून सांगण्यात आले होते. परंतु सभेचे नियोजन करणाऱ्या समन्वयकांनी दुपारी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी अधीक्षकांना सांगितले.
त्यानंतर अधीक्षकांना सभेची परवानगी मागणारे पत्रही देण्यात आले आहे. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासोबत समन्वयकांची बैठक झाली. यासभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने शनिवारी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ पोवई नाक्यावर उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समन्वयकांनी केले आहे.
जरांगे पाटील यांच्या सभांना संपूर्ण राज्यात प्रचंड मोठा जनसमुदाय लोटत आहे त्यादृष्टीने सभेच्या बंदोबस्ताचे सातारा पोलिसांनी नियोजन सुरू केले आहे. सातारच्या सभेनंतर मेढा व वाई येथे जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत.