महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : (बिलकीस शेख)
तरडगाव/ केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने फलटण तालुक्यातील तरडगाव व पाडेगाव या ठिकाणी परसबाग निर्मिती करण्यात आली असून त्याचे पंचायत समितीच्या उपसभापती रेखा खरात यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन करण्यात आले .
सध्या कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्यक्ष लोकांचा सहभाग न घेता बालकांमधील बुटकेपणाचे व कुपोषणाचे प्रमाण तसेच जन्मतः कमी वजनाचे बालकांचे प्रमाण कमी करणे, ॲनिमिया सर्वच वयोगटातील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे ही प्रमुख उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या परसबागेमध्ये पेरू, पपई, लिंबू, केळी ,शेवगा, कढीपत्ता, तुलसी, पुदिना, गाजर, बीट, हळद, आले, वांगी, टोमॅटो सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या व सर्व प्रकारच्या शेंगवर्गीय भाजीपाला तसेच इतर स्थानिक भाजीपाला व फळे यांचा समावेश आहे. उपक्रमाच्या प्रसारासाठी ‘पोषण के लिए पौधे’ या घोषवाक्यांचा वापर करण्यात येत आहे
दोन्ही गावच्या अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी उत्कृष्टरित्या बनविलेल्या परसबागेची पाहणी करून त्यांच्या या कामकाजाचे कौतुक उपसभापती रेखा खरात यांनी केले.यावेळी माजी सभापती वसंतराव गायकवाड, दोन्ही गावचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन कोमल फुले यांनी केले. प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी भरत कोळेकर यांनी केले तर पर्यवेक्षिका ज्योती दीक्षित यांनी आभार मानले.
तरडगाव येथे सतीश सुरेश गायकवाड यांनी तर पाडेगाव येथे मंदाताई घोरपडे यांनी परसबागेसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. सोशल मीडिया व वैयक्तिक मार्गदर्शना द्वारे परसबाग करण्याबाबत गावातील कुटुंबीयांना व लाभार्थींना प्रोत्साहित करण्यात येत आहे.यातून घर तिथे परसबाग हा उपक्रम राबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे.