पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने पुण्यात आंतर-माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन
पुणे, 24 जून 2025
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्फे अनेक लोकोपयोगी योजना आणल्या जातात. या योजनांचा लाभ शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती योग्य प्रकारे आणि नियोजनपद्ध रित्या होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत पत्र सूचना कार्यालय (PIB) आणि केंद्रीय संचार ब्युरो कार्यालय (CBC) काम करत आहे. पुण्यातील केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या संस्थांनी या दोन्ही संस्थांशी समन्वय राखून आपल्या उपक्रमांना प्रसिद्धी द्यावी, असे प्रतिपादन पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम क्षेत्र महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी केले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत पत्र सूचना कार्यालय (PIB) आणि केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयाच्या (CBC) वतीने आज पुणे येथे IMPCC अर्थात आंतर-माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय संबोधनात श्रीमती वत्स शर्मा बोलत होत्या.

पुण्यातील विविध शासकीय संस्थांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, पत्र सूचना कार्यालय ही संस्था केंद्र सरकार आणि प्रसार माध्यमे तसेच केंद्र सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करते. माहितीच्या प्रसारासाठीचा एक अधिकृत स्त्रोत म्हणून पत्र सूचना कार्यालयाने ओळख प्राप्त केली आहे. फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी पत्र सूचना कार्यालय महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
IMPCC अर्थात आंतर-माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व शासकीय संस्था आणि पत्र सूचना कार्यालय यांच्यात समन्वय राखण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाला आहे. शासकीय संस्थांनी या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या मंत्रालयाच्या योजना, उपक्रम यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे, असे स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले.

CBC, पुणे प्रादेशिक कार्यालयात आयोजित या बैठकीस आकाशवाणी, डिफेन्स पी आर ओ, मध्य रेल्वे, इंडियन पोस्ट विभाग, आयकर विभाग, नेहरू युवा केंद्र, राज्य IEC ब्युरो, यशदा, महा-मेट्रो, लिड डिस्ट्रिक्ट बँक, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, ICMR-NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपॅथी, IISER, CSIR-NCL, DIAT, NIBM, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, CBRTI, High Energy Materials Research Laboratory (HEMRL), HEMRL(DRDO), IITM, CIRT, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे, सावित्रीबाई पुणे फुले विद्यापीठ, आयुका, सी-डॅक, कॉलेज ऑफ एग्रीकल्चर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, IUCAA आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय तसेच राज्य सरकारी संस्थांनी यावेळी त्यांना माहितीच्या प्रसारादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या अधिकाऱ्यांना त्यांना यासंदर्भात शक्य ती सर्व मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने या बैठकीस पत्र सूचना कार्यालयाचे संचालक रबी हाश्मी, उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी, CBC, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक निखिल देशमुख, PIB सहायक संचालक निकीता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
































