पेडगाव, ता. खटाव –
पेडगाव (ता. खटाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा सचिव नंदकुमार यशवंत इंगळे यांने मनमानी कारभार केल्याचे उघड झाले आहे. इंगळे यांनी गावातील तथाकथित ‘चांडाळ चौकडी’च्या संगतीत राहून, संचालक मंडळाची कोणतीही बैठक न घेता व मंजुरी न घेताच, दोन गैरहजर संचालकांविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव थेट निबंधक कार्यालयात दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 78 नुसार, संचालक अपात्र ठरविण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया व संचालक मंडळाच्या ठरावाची आवश्यकता असते. सचिवाने ही प्रक्रिया डावलून गावातील चांडाळ चौकडीने निबंधकांच्या नावे तयार केलेल्या अर्जावरून एकतर्फी प्रस्ताव दाखल केल्याने ही कारवाई कायदेशीर नियमांच्या पूर्ण विरोधात आहे, सचिवाने पदाचा गैरवापर करून अशा प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारानंतर संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळातील इतर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिवावर कारवाईची जोरदार मागणी केली आहे. सचिवाने यापूर्वी या संस्थेत मयत सभासदांच्या नावे कर्ज प्रकरण करून त्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्याची परतफेड करणे तसेच शेतकरी निवास अस्तित्वात नसताना शेतकरी निवास चे कर्ज प्रस्ताव तयार करून ते जिल्हा बँकेकडून मंजूर करून आणने व कमिशन घेणे अशा अनेक गैर कृत्यांची यादी सोबत जोडून काही संचालकांनी याबाबत निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
सचिवाने आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या कारभारात गोंधळ निर्माण केला आहे.मर्जीतील संचालक गैरहजर असतानाही हजेरी बाबत त्याचे घरी जाऊन सह्या घेणे, संस्थेच्या परवानगीशिवाय स्वतः गैरहजर राहणे, संस्थेतील गोपनीय माहिती सभासदांशिवाय अन्य लोकांना पुरविणे, कार्यालयात नेमून दिलेल्या वेळेत हजर न राहणे, संस्थेचे कागदपत्रे व रजिस्टर अद्यावत न ठेवणे, कोणत्याही मंडळ बैठकीविना निर्णय घेणे, गावातील चांडाळ चौकडीच्या सांगण्यावरून निर्णय घेणे म्हणजे संस्था सदस्यांच्या विश्वासाला धोका देणं आहे, असे अनेक गैरप्रकार मागील अनेक वर्षांपासून संस्थेत सुरू असून जिल्हा बँकेचे अधिकारी, निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने संस्थेचे सभासद व संचालक माझे काहीही वाकडे करू शकत नसल्याने या सचिवाने अनेक गैरप्रकार केल्याने संस्थेचे सभासद सचिवाच्या कार्यपद्धतीला वैतागले असून सदरच्या सचिवाला पदावरून हटवण्याचे मागणी करू लागलेले आहेत.
संचालक मंडळाचे परवानगीशिवाय संचालक अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करणे या प्रकरणामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये ही तीव्र नाराजी पसरली असून, सचिवावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
निबंधक कार्यालयात या प्रस्तावावर दिनांक 14 जुलै 2025 रोजी सुनावणी नेमण्यात आली असून सदरच्या प्रस्तावाची वैधता तपासली जाणार असून, सचिव इंगळे यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, सचिव नंदकुमार इंगळे यांना प्रस्तावा बाबतची कागदपत्रे संचालकांनी मागणी केली असता कागदपत्र दिली जात नसून माझ्या मुलाचे लग्न आहे त्यामुळे मी गडबडीत आहे, कागदपत्रे हवे असल्यास निबंध कार्यालयास संपर्क करावा असे उत्तर दिले जात आहे.
संस्था कंगाल, सचिव मालामाल
नंदकुमार इंगळे हा गेल्या अनेक वर्षांपासून पेडगाव विकास सोसायटीत सचिव पदावर कार्यरत आहे त्याच बरोबर शेजारील उंबर्डे या गावच्या विकास सेवा सोसायटीतही सचिव पदावर कार्यरत असल्याने पेडगावच्या सोसायटीत सहाय्यक कर्मचाऱ्याची नेमणूक करून स्वतः मात्र त्याचे मर्जीनुसार संस्थेत येत जात असतो. पेडगाव येथे विकास सेवा सोसायटीचे कार्यालय असून सदरच्या कार्यालयात मासिक मीटिंग शिवाय सचिव कधीच हजर राहत नाही. ऑफीस मध्ये बऱ्याच वेळा गैरहजर मात्र पगारासाठी कायम हजर दाखवून दरमहा चा पगार घेत असतो.संस्थेकडे आज अखेर एकही रजा अर्ज केलेला नाही. कामापेक्षा पगार जास्त मिळत असल्याने संस्था कंगाल व सचिव मालामाल असल्याचे सभासदांकडून बोलले जात आहे. पेडगाव मध्ये अनेक शिक्षित तरुण व तरुणी असून नोकरी नसल्याने ते बेरोजगार आहेत अशापैकी एखाद्या होतकरू तरुणाची संस्थेच्या सचिव पदी नेमणूक करण्याची मागणी संस्था सभासदांकडून वरिष्ठ कार्यालयाकडे केली जात आहे.






























