महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी पुसेगांव :
खटाव तालुक्यातील विसापूर जवळील नेर तलाव परिसरात पहिल्यांदाच गव्याचे दर्शन झाल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, हे गवे चांदोली अभयारण्यातील असण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. खटाव तालुक्यातील नेर तलाव परिसरात शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले असता त्यांना दुपारच्या दरम्यान गव्याचे दर्शन झाले. या वेळी शेतकरी गव्याला पाहून घाबरले. शेतकर्यांना बघून गव्याने डोंगराच्या दिशेने धूम ठोकली.
मात्र, यामुळे परिसरातील शेतकरी, तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिसरातील शेतात ओलिताची कामे सुरू आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी शेतकर्यांना ओलितासाठी शेतात जावे लागते. मात्र, शेत-शिवारात गवा आढळून आल्याने शेतकरी रात्रीचे शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत.
गवा वन्यजीव प्राणी असल्याने त्यांना मानवाचा अधिवास नसतो.
त्यामुळे, शेतकर्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, तसेच हा गवा डोंगराकडेला असलेल्या शेत-शिवारातून फिरत असल्यामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने गव्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे. खटाव तालुक्यातील नेर तलावाजवळ आढळलेला गवा चांदोली अभयारण्यातील असावा, असा तर्क पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, चांदोली अभयारण्यातून आलेला गवा कराड तालुक्यातील पाचवड फाटा, सोनसळच्या चौरंगीनाथ परिसरात दिसला होता.
तो गवा कृष्णा नदी ओलांडून आला होता. तसेच कराड-तासगाव रस्ताही ओलांडून चौरंगीनाथ परिसरातील शेतकर्यांनी पाहिले होते. तेथून हुसकावून लावल्यानंतर हुसकावलेले तीन गवे सहा महिन्यांपूर्वी खानापूर तालुक्यातील विटा परिसरात दिसले होते. वनविभाग व ग्रामस्थांनी त्यांना तेथूनही हुसकावले होते. वन विभागाच्या हद्दीतील झाडेझुडपे व उसाच्या पिकाचा आसरा घेत लपत-छपत प्रवास करणारे गवे चांदोलीपासून पाचवड फाटामार्गे चौरंगीनाथ व तेथून विटा मार्गे नेर तलावाच्या दिशेने गेले असावेत. असा वनविभागाचाही अंदाज आहे.