माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय संचार ब्युरोचे माहिती-चित्र रथ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रवाना
पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण
पुणे, 19 जून 2025
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे पंढरपूर वारीनिमित्त दोन माहिती-चित्र रथ आज पुण्यातून निघाले. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या रथांचे उद्घाटन करून मार्गस्थ केले. केंद्र सरकारच्या अकरा वर्षातील विविध योजनांची दृक-श्राव्य माहिती देत हे डिजिटल रथ संपूर्ण वारीत दोन्ही मार्गांवर चालत राहतील. हे डिजिटल रथ पुणे ते पंढरपूर असा प्रवास करतील.


याप्रसंगी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्र महासंचालक, स्मिता वत्स शर्मा देखील उपस्थित होते.

या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, “आपल्या महाराष्ट्राची शेकडो वर्षांची परंपरा म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी, हा पालखी सोहळा आपल्यासाठी पर्वणी असते. एक वेगळा अनुभव असतो; या वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी, भाविक पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. ही वर्षानुवर्षे जुनी परंपरा वृद्धिंगत होताना आपण पाहत आहोत. गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या वारीच्या निमित्ताने होणार आहे. त्यासाठी या दोन डिजिटल रथांचे उद्घाटन आज होत आहे; माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्याचे काम हे गावागावापर्यंत पोहचणार आहे.”
“केवळ देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक शक्तिशाली, सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून आपल्या देशाचे नाव घेतले जात आहे. अकरा वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची, असे म्हटले जाते; सोबत समृद्ध, सशक्त आणि सुरक्षित भारताची अकरा वर्षे असे देखील आपण म्हणू शकतो हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले. देशाची 25 कोटी जनता दारिद्रय रेषेच्या वर आली, देशातील सर्वसामान्य माणसांचा विचार झाला. गरीब कल्याणाच्या असंख्य योजना आणल्या गेल्या. म्हणून ही अकरा वर्ष मला जन कल्याणाची, आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीची आहेत; विकसित भारताचा पाया आहेत, आता कळस बांधण्याकडे आपण चाललो आहोत.” असे विचार त्यांनी यावेळी मांडले.

केंद्रीय संचार ब्युरोच्या विभागीय कलाकारांसोबत नोंदणीकृत लोककलावंतांनी वर आधारीत गीतांचे सादरीकरण केले. यावेळी केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे विभागीय कलाकार, गायक-गीतकार-संगीतकार मकरंद मसराम यांनी सादर केलेल्या स्वरचित गीताचे केंद्रीय राज्यमंत्री यांनी कौतुक केले.

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख विविध योजनांचा उल्लेख करून त्यांचा राज्यातील जनतेला लाभ मिळाल्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी नमूद केले.
एलईडी डिस्प्ले स्क्रीन आणि कलाकारांच्या सादरीकरणानी सुसज्ज असलेले हे रथ लाखो वारकऱ्यांसह यात्रेच्या मार्गावर प्रवास करतील आणि पारंपारिक सांस्कृतिक सादरीकरणे तसेच सरकारी योजनांवरील माहिती पुस्तिकांचे वितरण करून केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या विविध कामगिरीचे दर्शन घडवतील.



































