महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांची उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया आज गतीमान झाली असून भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे निष्ठावंत व जेष्ठ कार्यकर्ते महादेव पवार यांनी बुधवार, दिनांक १४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी नियमानुसार अर्ज सादर केला.
महादेव पवार यांच्यासोबत माजी नगरसेवक अजय यांनी देखील स्वतंत्र अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपाकडून दाखल झालेला हा पहिलाच अधिकृत अर्ज ठरला असून पक्षात उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्ज दाखल करताना पवार यांच्या समर्थकांनी उपस्थित राहून त्यांना साथ दिली.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून सकाळी ११ ते दुपारी २ ऑनलाइन आणि ११ ते ३ प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे तर सहाय्यक अधिकारी म्हणून रोहिणी शिंदे आणि प्रशांत व्हटकर ही जबाबदारी सांभाळत आहेत.
२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. अंतिम मुदत जवळ येत असल्याने सर्वच पक्षांच्या इच्छुकांमध्ये हालचालींना वेग आला आहे. कराड नगरपरिषद निवडणुकीचे चित्र आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महादेव पवार का चर्चेत?
महादेव पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून कराड दक्षिण मतदारसंघात भाजपाच्या संघटनात सक्रीय असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांचे विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय व सामाजिक कामांमुळे त्यांचे जनसंपर्क भक्कम असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.






























