
सस्तेवाडी ता.फलटण येथील लोंढेवस्तीनजीक अपघाताचा बनाव करून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत दोन आरोपींना अटक करत गुन्हा उघड केला आहे.
सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे राहणारे गणेश बाळू मदने (वय ४०) हे फलटण–लोणंद रस्त्यावर मोटारसायकल अपघातात जखमी झाल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात मिळाली होती. यावरून अपघाताची नोंद करण्यात आली. मात्र तपासादरम्यान घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांवरून संशय बळावला. मोटारसायकल मुद्दाम पाडल्याचे, जखमा अपघाती नसल्याचे तसेच पीडिताच्या स्थितीवरून खुनाचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (वय २२, रा. सोमवार पेठ, फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी खुनाचा प्रयत्न करून पसार होण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथक व फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा उलगडा होत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.




















