शिक्षण विभाग राजकीय दबावात काम करत असल्याची चर्चा
दहिवडी : माण तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील वादग्रस्त शिक्षक शशिकांत खाडे याला दहिवडी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर ‘एक्का दुरी तिरी’ची पाने पिसताना पकडले होते.या प्रकरणी शिक्षण विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केलेल्या अहवालाची फाईल झेडपीच्या वरिष्ठ कार्यालयातून अद्यापही पुढे सरकत नाही.या फाईलचा अजून किती दिवस मुक्काम राहणार? झेडपी’चा शिक्षण विभाग राजकीय दबावाखाली काम करत आहे का?अशी चर्चा माण तालुक्यात सुरू आहे.या कार्यवाहीबाबत विलंब होत असल्याने लोकांचा शिक्षण विभागावरील विश्वास उडू लागला आहे.
माण तालुक्यात गणवेश विक्रीवरून शिक्षकांमध्ये झालेली मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच तोच शिक्षक जुगार खेळताना पोलिसांच्या हाती रंगेहात लागला. शशिकांत खाडे या शिक्षकावरही गुन्हा दाखल झाला.गणवेश विक्री प्रकरण असो किंवा शिक्षक मारहाण प्रकरण असो शिक्षण विभागाने या शिक्षकावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही.त्यामुळेच त्याची मजल चक्क पत्त्याची पाने पिसण्यापर्यंत गेली.परिणामी उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील हा शिक्षक पत्त्याची पाने कशी पिसायची याचेच शिक्षण देणार का? अशी संतापजनक प्रतिक्रिया माणमधील लोकांमधून व्यक्त होत आहेत.
प्राथमिक शिक्षक असतानासुद्धा खाजगी गणवेश विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शशिकांत खाडे याच्या कारनाम्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले.परंतु पोलिसात तक्रार असणाऱ्या जुगार प्रकरणी सुद्धा आठ दिवसापूर्वी माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून झेडपीच्या वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला असतानाही त्याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही का झाली नाही? शिक्षण विभागावर कोणाचा राजकीय दबाव आहे ? शिक्षण विभागाच्या नावाला बट्टा लावणाऱ्या या वादग्रस्त आणि जुगारी शिक्षकावर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभाग एवढी दिरंगाई का करत आहे? अशा अनेक तर्क-वितर्कांना माण तालुक्यात उधाण आले आहे.