महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी :
सर्व सामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. बुधवार १ जुलै २०२० पासून भारतात बँक व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. नव्या नियमांचा थेट आपल्यावर परिणाम होऊ शकतो. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० जूनपर्यंतच्या कालावधीसाठी बँकांच्या नियमांमध्ये बदल केले होते. काही नियम तात्पुरते स्थगित करुन ग्राहकांना सवलत देण्यात आली होती. ही सवलत मंगळवारी संपेल आणि बुधवार १ जुलैपासून बँकांचे नवे नियम लागू होतील. नियमांतील बदलांची मुदत वाढवण्याची घोषणा झाली नाही तर बँका १ जुलैपासून सवलत देणार नाही.बँकांच्या नव्या नियमानुसार एटीएम सेवेसाठी बँका पुन्हा फी आकारणार आहेत. तसेच एका बँकेच्या कार्डाचा वापर दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये करण्यावर असलेल्या मर्यादेचा नियम पुन्हा लागू होणार आहे.
बचत खात्यासाठी किमान रकमेचा नियम पुन्हा लागू होणार
देशातील सर्व बँकांमध्ये बचत खात्यात किमान किती रक्कम ठेवावी या संदर्भात नियम आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत काळासाठी स्थगित केलेला हा नियम पुन्हा लागू होणार आहे. या नियमामुळे ज्या बँकेत आपले बचत खाते आहे त्या बँकेच्या नियमानुसार बचत खात्यात किमान रक्कम ठेवण्याचे बंधन १ जुलैपासून पुन्हा लागू होणार आहे. बचत खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर बँक संबंधित खातेदारावर दंडात्मक कारवाई करणार आहे.
अटल पेंशन योजनेसाठी होणार ऑटो डेबिट
केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील १८ ते ४० वयोगटातील नागरिकांसाठी अटल पेंशन योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी बचत खात्यामधून थेट रक्कम वळती करण्याचा पर्याय आहे. या पद्धतीने दरमहा ठराविक रक्कम जमा करणाऱ्यांना केंद्र सरकार निवृत्तीनंतर नियमित पेंशन देणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एप्रिल ते जून या कालावधीत नागरिकांच्या खात्यांमधून रक्कम वळती करण्यास स्थगिती दिली होती. याऐवजी त्या रकमेचा भरणा केंद्र सरकार स्वतः करेल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ही सवलत संपली असून १ जुलै पासून नागरिकांच्या खात्यांमधून अटल पेंशन योजनेसाठी रक्कम वळती करण्याचा पर्याय पुन्हा खुला होणार आहे.