महाराष्ट्र न्यूज ,प्रतिनिधी :बारामती
बारामती शहरामध्ये भिगवण रोडवर अर्बन ग्राम येथील रहिवासी असलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा नागरिक आयटी इंजिनियर असून गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत होता मात्र उपचारासाठी पुणे येथे त्याचे जाणे झाल्याने त्या दरम्यान त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी हा नागरिक पुण्याला जाऊन आला असून तिथून आल्यानंतर त्याला सर्दीचा त्रास सुरु झाल्याने त्याने स्वतःहून रुई रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला व टेस्ट झाल्यानंतर तो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे.
या रुग्णाला रुई येथील कोविड केयर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्याच्या संपर्कातील काही जणांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून बारामती शहर कोरोना मुक्त होती मात्र या रुग्णाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बारामती शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
तरी बारामती शहरातील सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. जर अत्यावश्यक काम असेलतरच घराबाहेर पडावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर वारंवार करावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे.