फलटण: फलटण तालुक्यातील तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अस्वच्छतेचे स्वरूप प्राप्त झालेले आहे, रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी असलेल्या खाटेवर असलेली निळी गादी वरून एकदम चकाचक आहे. परंतु ती उचलून त्याखाली पाहिले असता तंबाखूजन्य पदार्थ, वापरलेले इंजेक्शन व त्यांच्या सुई अस्ताव्यस्त पहावयास मिळतात, गादीखालचा हा संपूर्ण भाग तांबरलेल्या अवस्थेत आहे.
रुग्णालयामध्ये अनेक सूचनाफलक आहेत हे केवळ बाहेरून आलेल्या रुग्णांसाठी असतात की काय? असा सवाल रुग्णांना पडत आहे, परंतु रुग्णालयामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता तसेच रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरामध्ये कांग्रेस (गवत) खूप माजले आहे याचा त्रास रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो आहे.
रुग्णालयाच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी असलेला हातपंप हा केवळ शोपीस बनला आहे, त्याचबरोबर रुग्णालयामध्येही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असलेला फिल्टर केवळ फक्त दाखवण्या पुरताच किंवा शो-पीस आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णालयातील रुग्णांना किंबहुना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. रुग्णाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी पिण्याच्या पाण्याबाबत चौकशी केली असता त्यांना बाहेरून पिण्यासाठी पाणी (बिसलरी बाटली) विकत घ्यावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वास्तविक चित्र पाहता सरकारी दवाखान्यांमध्ये नेहमी सतत सामान्य किंवा गोरगरीब जनता हीच सेवेचा लाभ घेत असते. परंतु सध्या कोरोना परिस्थितीमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत किंवा ते कसेबसे आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. रुग्णालयाच्या बाहेरच शेजारी असणाऱ्या हॉटेल किंवा गाड्या वरून पाण्याची बिसलरी साधी बाटली (थंड नसलेली) ही २० रुपये देऊन खरेदी करावी लागत असल्याची बाब समोर येत आहे. वेळेचा अभाव आणि आवश्यकता या कारणांमुळे ती खरेदीही करावी लागते.
रुग्णालयातील डॉ. अनिल कदम हे अनेक महिन्यांपासून त्यांची बदली गिरवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झाली आहे, परंतु त्यांच्या नावाचे फलक अजूनही जैसे थे पाहावयास मिळत आहे म्हणजेच, सध्याचे या तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेमके कोण डॉक्टर कार्यरत आहेत? की कोणतेच डॉक्टर कार्यरत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णाच्या स्वच्छतेच्या नावाखाली रुग्णालयातील काही स्वच्छता करणारे कर्मचारी शंभर-दोनशे रुपयांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा या सर्व परिस्थितीवर तालुका आरोग्य विभागाने यामध्ये लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.