महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: फलटण
सराईत गुन्हेगारास पकडून त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने आणि ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिसांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या खबरी वरून फलटण येथील सपोनि आनंद साबळे यांच्या टीमने 21 ऑगस्ट रोजी या सराईत गुन्हेगारास फलटण शिंगणापूर रस्त्यावरील कोळकी परिसरात पकडले आहे. सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक, गुन्हे शाखा सातारा, यांनी सांगितल्या नुसार एक इसम फलटण शहरामध्ये सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना दिल्यानंतर वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.
त्यावेळी त्याच्याकडे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक डीव्हीडी प्लेअर मिळाला आहे. चौकशी नंतर त्याने सांगितले की दहा-बारा महिन्यापूर्वी म्हसोबाची वाडी ता. इंदापूर जि. पुणे येथे मोटर सायकल वरून चाललेल्या महिलेच्या गळ्यातून दागिने ओढून चोरी केली होती. तसेच सस्तेवाडी ता. फलटण येथील सगुना माता प्राथमिक विद्यामंदिर मधून डीव्हीडी प्लेअर चोरी केला होता. वरील दोन्ही गुन्हे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा, धीरज पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंद सिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार तानाजी माने ,राम गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, रवी वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्ण , म.पो. ना. मोना निकम , संजय जाधव, विजय सावंत, आदी. सहभागी होते.