दहिवडी : ता.१७
माण तालुक्यातील वावरहिरे येथे तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे. दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आल्याने लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.
निसर्गाचा स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या तरस या वन्य प्राण्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रात्री रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा तरस गतप्राण होऊन रस्त्यालगत जावून पडला असल्याची चर्चा उपस्थित लोकांमधून होत होती.
या प्रकाराबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर ठिकाणी वनरक्षकांना पाचारण करून मृतावस्थेत असलेल्या तरसाचा पंचनामा केला.
तरस हा निरुपद्रवी प्राणी असून तो मेलेली जनावरे, त्यांचे हाडांचे अवशेष इत्यादींवर जगणारा प्राणी आहे. तरसाने मानवावर आजपर्यंत कधीही हल्ला केला असल्याची नोंद इतिहासातदेखील नाही.त्यामुळे निसर्गाच्या या स्वच्छतादूताचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे तरसासारख्या वन्य प्राण्यांना हानी न पोहचवण्याचे आवाहन वनविभागाच्या मार्फत करण्यात आले आहे.