महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:श्रीकृष्ण सातव :
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या समुपदेशनाने करण्यात याव्यात व शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत. तसेच सदर जिल्हा अंतर्गत विनंती बदल्यांची कार्यवाही करताना शिक्षकांच्या रिक्त पदाच्या समानीकरण यासंदर्भातील शासनाचे आदेश कटाक्षाने पाळण्यात यावेत अशा आशयाचे आदेश कक्ष अधिकारी स.ना.भंडारकर यांनी निर्गमित केले आहेत. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 5 ऑगस्ट रोजी हे पत्र पाठविण्यात आलेले आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात कार्यवाही करताना जिल्हा परिषद स्तरावर काही मुद्दे उपस्थित झाले आहेत .तसेच 15 जुलैच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या समुपदेशनाच्या वेळी इच्छुक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे . त्यामुळे सद्य स्थितीत कोविड -19 चा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक आंतर ठेवण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी शिक्षकांची संभाव्य गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने कोणाचीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेऊन तसेच कोविड -19 संदर्भातील सामाजिक अंतर व इतर शासनाच्या सूचनांचे पालन करून यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या समुपदेशना द्वारे करण्यात याव्यात आणि शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत असे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा अंतर्गत विनंती बदल्यांची कार्यवाही करताना शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरण यासंदर्भात शासनाचे आदेश कटाक्षाने पाळण्यात यावेत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने करावयाच्या आंतरजिल्हा बदल्या संदर्भात कार्यवाही विहित कालावधीत करण्याची ची दक्षता घेण्यात यावी अशी सूचनाही त्या पत्रात करण्यात आली आहेत.