जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केले अन्नधान्य, कपडे व औषधांचे वाटप
सातारा : अतीवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची जाणीव ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जावळी तालुक्याच्या दक्षिण भागातील फळणी आणि शेंबडी या गावांमध्ये अन्नधान्य, कपडे आणि औषधांचे वाटप केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा युवराज पवारांकडे सोपविली. यानंतर कोणत्याही सत्कार समारंभाकडे न वळता जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी सातार्यात अतीवृष्टीमुळे हाल सोसाव्या लागत असलेल्या लोकांकडे लक्ष देत पहिले प्राधान्य अतीवृष्टीग्रस्त आणि दरडग्रस्तांना दिले.
अतीवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. डोक्यावरचा निवारा गेला, शेतात दगड-गोटे आलेत. अशा या भीषण प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लोकांच्या मदतीला धावली. जिल्हा मनसेतर्फे जावळी तालुक्याच्या दक्षिण भागातील फळणी आणि शेंबडी या गावांमध्ये जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी अन्नधान्य कपडे आणि औषधांचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचा आदर्श लोकांपुढे घालून दिला आहे.
यावेळी राहूल शेडगे, प्रशांत साळुंखे, अश्विन गोळे, नितीन पार्टे, रोशन भोसले, सौरभ झेंडे, अविनाश दुर्गावळे, राजेंद्र पवार, राजेंद्र बावळेकर, संजय गायकवाड आणि मनसैनिक उपस्थित होते. मनसेच्या या विधायक कार्यामुळे फळणी, शेंबडी गावातील ग्रामस्थांनी युवराज पवार यांचे आभार मानले.