बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात बाजरी, ज्वारी बरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु यावर्षी पावसाने अनेक शेतकऱ्यांनी टाकलेले कांद्याचे बी, तसेच रोपे पावसाने खराब झाली, वाया गेली आहेत. त्यामुळे यंदा कांद्याच्या बियाणांचा व रोपांचा अनेक भागात तुटवडा जाणवत आहे.
पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, मोराळवाडी, मुर्टी या परिसरात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी या भागात पाऊसही चांगल्या प्रमाणात झाला आहे. गर्वी व हळवी अशा दोन्ही प्रकारच्या कांदा पिकांची लागवड या भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. अंदाजे अडीच हजार रुपये किलो प्रमाणे कांदा बियाणे खरेदी केली जात आहे तसेच रोपांचा वाफा दीड ते दोन हजार रुपये प्रमाणे शेतकरी विकत घेत असल्याची माहिती पळशी येथील शेतकऱ्यांनी दिली.
गेल्यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला होता त्यामुळे या वर्षीही बाजार भाव चांगला मिळेल या अपेक्षेने शेतकरी या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लावत आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांचे बियाणे, कांदे हे पावसाने गेले आहेत. त्यामुळे यंदा बियाणांचा तसेच कांद्याच्या रोपांचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती यावेळी बाळु कराडे यानी दिली.