महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सध्या देशभरात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पाहता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या व्यवसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
याबाबत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलेआहे. महाराष्ट सीईटीच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील. असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
देशातील कोरोनाची स्थिती भयंकर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न समोर असून त्याचमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. याआधी या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात येणार होती.मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
इंजीनियरिंग, फार्मसी आणि अँग्रीकल्चर पदवी प्रथम वर्षासाठी गरजेची असलेली एमएचटी-सीईटी, पदवी आणि पदव्युत्तर च्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमसीए या व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच इतर परीक्षांच्या सीईटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
याआधीही अव्यवसायिक तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच या अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ती ऐच्छिक ठेवण्यात आली होती.