महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
पुणे :एका वेबसाईटच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या “हाय प्रोफाईल” वेश्या व्यावसायकांचा चतु:शृंगी पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बँकेचा सहायक मॅनेजर, संगणक अभियंत्यासह उच्च शिक्षितांचा सहभाग आहे. या प्रकरणात आणखी मोठया व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रविकांत बालेश्वर पासवान (वय 34, रा. सुसगाव, मुळ रा. मुसाहरी, मुजफ्फरपुर बिहार), दिपक जयप्रकाश शर्मा (वय ३६, वर्षे साईचौक, बालेवाडी, मुळ रा. जारसुगुडा ओरिसा), सुरेश प्रल्हाद रणविर (वय २५, ओयो होम, मॉडर्न हॉस्टेलजवळ, बाणेर, मूळ रा. उमरी भाटेगाव, हातगाव, नांदेड), नाकसेन रामदास गजघाटे (वय ५२, बावधान) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील संशयित आरोपी शिवानी पाटील ऊर्फ जोया रेहान खान (रा. भोपाळ, मध्यप्रदेश) ही फरारी आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
23 जून रोजी बाणेर येथील धनकुडे वस्तीजवळ असलेल्या ओयो हॉटेल व एका रो हाऊसमध्ये अवैध पद्धतीने वेश्या व्यावसाय सुरु असल्याची खबर चतुःश्रृंगी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने संबंधीत ठिकाणी छापा घालुन रविकांत पासवान व दीपक शर्मा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधीत व्यक्ती या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवित असल्याचे निष्पन्न झाले. तसेच या प्रकरणात अनेक मोठया व्यक्ति गुंतल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पासवान हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. पासवान हा शर्मा व अन्य लोकांच्या मदतीने हायप्रोफाइल वेश्या व्यावसाय चालवित होता. त्याच्याकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव यांच्या पथकाने बाणेर, बालेवाडी व मुंबई येथून काही जणांना अटक केली.
त्यावेळी संबंधीत आरोपी हे “विट सर्व्हिसेस एस्कॉर्ट” या वेबसाईटद्वारे ऑनलाईन वेश्या व्यावसाय चालवित होते. ग्राहकांची बुकिंग करण्यासाठी वापरण्यात आलेले ११ मोबाईल, चार लॅपटॉप व अॅपल आयपॅड, वेश्या व्यवसाय वाहतुकीसाठी वापरली जाणारी टाटा सफारी कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे करीत आहेत.
मुख्य संशयित आरोपी रविकांत पासवान हा मुरुम येथील बैंक ऑफ बडोदामध्ये सहायक व्यवस्थापक या पदावर काम करीत आहे. तर दिपक शर्मा हा संगणक अभियंता आहे. सुरेश रणवीर हा हॉटेलचा व्यवस्थापक आहे, तर नाकसेन गजघाटे हा रो हाऊसचा मालक आहे.