पुणे : त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. शुक्रवारपासून अमरावती शहरात सुरु असलेल्या जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले होते.
यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केला. आता पुण्यातही या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा येथे जातीय हिंसाचार भडकला होता. याची दक्षता म्हणून पुणे ग्रामीण भागात कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही समाजकंटक इन्स्टाग्राम, व्हॉट्स अप, ट्विटर, फेसबुक इत्यादी समाजमाध्यमांद्वारे दोन समाजात तेढ निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून CRPC-144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे निर्देश दिल्याचं जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितलं. 14 ते 20 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कलम 144 लागू राहणार आहे.
दरम्यान समाज माध्यमांवर चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणे तसेच 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास आणि सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच शस्त्र आणि लाठी बाळगणे कलम 188 प्रमाणे दंडणीय कार्यवाहीस पात्र राहतील, असंही सांगण्यात आलं आहे.