महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड : कोरोना काळात मोबाईल, घड्याळ, पेन यासह रूग्णालयातील थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, स्टेथोस्कोप, ईसीजी इलेक्ट्रोड्स, दंत साधने अशी अनेक उपकरणे कोविड-19 विषाणूची वाहक बनू शकतात. या साधनांवर विषाणूचा शिरकाव झाल्यास, ही साधने मोठ्या लोकसंख्येला संसर्ग पोहचवू शकतात. त्यामुळेच अशा दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणाऱ्या ‘युव्ही सेवक 360°’ या विषाणूनाशक उपकरणाचे संशोधन कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे च्या इन्स्ट्रुमेंटेशन ॲन्ड कंट्रोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या उपकरणाला विविध प्रयोगशाळांनी प्रमाणित केले असून, हे उपकरण पुण्यातील एनबीई टेक कंपनी मार्फत लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ. अग्रवाल आणि डॉ. आहुजा यांनी सांगितले, की सध्या जगभर पसरलेल्या कोविड – १९ साथीच्या रोगामुळे आरोग्य सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, कर्मचाऱ्यांवर हा संसर्ग रोखण्यासाठी प्रचंड दबाव वाढला आहे. किंबहुना ही आरोग्यसेवा देताना ते स्वत: संसर्गित होण्याची जास्त शक्यता आहे. खरंतर हे विषाणू अनेक ठिकाणी आढळतात. अगदी जिथे कोविड-१९ चे उपचार सुरू आहेत, अशा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर्सच्या वैद्यकीय साधनांवर; तसेच वॉर्ड, ओपीडी, ऑपरेशन थिएटर येथील अन्य वैद्यकीय साहित्य, औषधी भांड्यांवरही हे विषाणू आढळून येतात. वास्तविक रूग्णालयातील ही साधने केवळ सार्स-को व्ही २ ने बाधित असतात, असे नाही. तर ही दूषित साधने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला तसेच आरोग्य सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, कर्मचाऱ्यांनाही संसर्ग बाधा पोहचवू शकतात, याकडे जागतिक संशोधकांनी लक्ष वेधले आहे.
पारंपारिक निर्जंतुकीकरणाच्या पद्धती या नेहमीच व्यवहार्य नसतात, कारण त्या वेळखाऊ असतात. तसेच आयआर थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर, स्टेथोस्कोप, ईसीजी इलेक्ट्रोड्स, दंत साधने इत्यादी उपकरणांसाठी योग्य नसतात. रूग्णालयातील विविध भांडी, पोर्टेबल वैद्यकीय उपकरणांमधून विषाणू आणि इतर जंतूंच्या प्रभावी आणि जलद नायनाटासाठी रूग्णालयाच्या सेटअपमध्ये युव्ही (अल्ट्राव्हायलेट) निर्जंतुकीकरणाचे महत्च अलीकडील कोविड-१९ साथीच्या रोगात स्पष्ट झाले आहे. याशिवाय हे सुरक्षा तंत्रज्ञान घर, हॉटेल, सलून आणि पार्लरमध्येही वापरले जाऊ शकते.
म्हणूनच, कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे च्या इन्स्ट्रुमेंटेशन ॲन्ड कंट्रोल विभागाच्या संयुक्त संशोधनातून अभिनव असे युव्ही निर्जंतुकीकरण यंत्र साकारण्यात आले आहे. या नाविण्यपूर्ण उपकरणात अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि नॅनोमेटेरियल लेप यांच्या एकत्रीकरणातून समाजात विविध स्तरावर वापरण्यात आलेली औषधी भांडी, तसेच वैद्यकीय उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येते. विशिष्ट प्रकारच्या विविध वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी ३० सेकंद ते ५ मिनिटांपर्यंतचा ऑप्टिमाइझ्ड एक्सपोजर अवधी या उपकरणासाठी प्रमाणित करण्यात आला असून, विविध प्रयोगशाळांतून याचे प्रमाणीकरणही करण्यात आले आहे.
एनबीई टेक, पुणे द्वारा युव्ही सेवक 360° या ब्रँड नावाने हे उपकरण बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. युव्ही सेवक 360° हे उपकरण विविध वैद्यकीय आणि इतर घरगुती क्षेत्रांमध्ये विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया) आणि बुरशीसारख्या जंतूंनी दूषित झालेल्या विविध साधनांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापराच्या गरजेनुसार ३०, ४० आणि ६० लिटर क्षमतेमध्ये उपलब्ध असणार आहे.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या दूरदृष्टीतून अनेक लोकोपयोगी संशोधने सुरू असून, या संशोधनाचा लाभ समाजातील विविध घटकांना व्हावा, यासाठी ही संशोधित उपकरणे वाजवी दरात लोकांना उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला कृष्णा अभिमत विद्यापीठाचे संशोधन असोसिएट डॉ. जयंत पवार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे च्या इन्स्ट्रुमेंटेशन ॲन्ड कंट्रोल विभागाचे प्रमुख डॉ. डी. एन. सोनवणे, एनबीई टेकच्या संशोधन आणि विकास विभागाचे प्रमुख शुभम गायकवाड उपस्थित होते.