महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
मंगळवार पेठेतील आर्य वृंदावन सोसायटीच्या 56 फ्लॅटधारकांनी बिल्डरच्या विरोधात नाहक होणाऱ्या त्रासाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर फ्लॅटधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की आर्या डेव्हलपर्सचे विकसक दिग्विजय गायकवाड यांनी बांधलेल्या आर्या वृंदावन सोसायटीत 56 सदनिकाधारक आहेत . गायकवाड यांनी या प्रकल्पांच्या उभारणीत फ्लॅटधारकांकडून लाखो रुपये उकळून कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. खरेदीपत्र पूर्तता न करणे, कॉमन टेरेस वापरू न देणे, कॉमन पार्किंगमध्ये उभे राहण्यास मज्जाव करणे आदी प्रकारचा त्रास बिल्डर गायकवाड आणि त्याची पत्नी व कर्मचारी मुफीज कापशीकर यांच्याकडून दिला जात आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या लाईनसुद्धा योग्य पध्दतीने दिली नसल्याची तक्रार आहे.
पिण्याचे पाणी अशुद्ध करणे, इमारतीच्या पार्किगमध्ये संबंध नसणाऱ्या व्यक्तींना पाठवणे, नळ कनेक्शन तोडणे या स्वरूपाचा त्रास बिल्डरकडून दिला जात असून सदनिकाधारकांना दमदाटीची भाषा वापरली जात आहे. या दडपशाहीच्या विरोधात संरक्षणाची मागणी करून बिल्डरला कठोर शासन करावे, असे साकडे 56 सदनिकाधारकांनी या तक्रार अर्जाद्वारे घातले आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास मोर्चा काढून येत्या दि. 14 -०९-२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.