सातारा- अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे सहकार क्षेत्रातील एक नामवंत व आदर्शवत कारखाना म्हणून पाहिले जाते. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे वेळेत पेमेंट अदा करणाऱ्या या कारखान्याचे कामकाज राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.
गायकवाड यांनी नुकतीच अजिंक्यतारा कारखान्यास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा.चेअरमन विश्वास शेडगे, संचालक यशवंत साळुखे, अनंता वाघमारे, अशोक शेडगे, इंद्रजित नलवडे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख उपस्थित होते.
गायकवाड यांनी सद्यस्थितीमध्ये साखर उदयोगाला असलेल्या अडचणी व त्या अनुषंगाने कारखान्यांनी करावयाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांचे हित लक्षात घेऊन त्यांना एफ.आर.पी प्रमाणे ऊसाचे पेमेंट वेळेत अदा करीत आहे. या कारखान्याचे कामकाज प्रगती पथावर नेण्यास आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रूपाने योग्य नेतृत्व लाभल्यामुळेच हा कारखाना दिवसेंदिवस आर्थिकदृष्टया सक्षम होत आहे. ऊस उत्पादक शेतक-यांचे हित विचारात घेऊन कारखान्याप्रती शेतकऱ्यांची विश्वासार्हता कायम रहावी यासाठी कारखान्याचे संचालक मंडळाने सामाजिक बांधिलकी स्विकारून अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन हा कारखाना आर्थिक दृष्टया सक्षम बनविला असल्याचे सांगून त्यांनी संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतूक केले.
चालू सन २०२१-२२ चे गळीत हंगामात झालेले एकूण गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा, तुटलेले ऊस क्षेत्राबाबत गायकवाड यांनी माहिती घेतली व कामकाजाचा विभागवार आढावा घेतला आणि कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी कारखान्याचे कामकाजाबद्दल माहिती अवगत करून दिली. यावेळी चेअरमन सावंत म्हणाले की, ऊस उत्पादक शेतक-यांचे हित विचारात घेऊनच कारखान्याचे कामकाज चालविले जाते. त्यामुळे कारखाना प्रगतीपथावर नेण्यास ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण आणि नेटके नियोजन असल्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर नेण्यास वाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.