मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मराठीसह बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे दिग्गज अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेली पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु औषधांचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याने काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे मनोरंजनविश्वाशी घट्ट नाते होते. करोनाकाळात वयाची पंच्याहत्तरी असतानाही त्यांनी ‘गोदावरी’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. काही दिवसांपूर्वीच ते स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसले होते. या मालिकेत ‘मल्हार’च्या गुरूंची भूमिका त्यांनी साकारली होती. तर संजीव जयस्वाल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या जीवनावर आधारित ‘आंबेडकर द लेजेंड’ या वेबसिरिज मध्येही ते झळकणार होते. या सिरिजमध्ये ते प्रमुख भूमिका म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणार होते. याचा ट्रेलरही गतवर्षी प्रदर्शित झाला होता.विक्रम गोखले यांना अभिनयाचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठीतील दिग्गज अभिनेते होते. वडीलांपाठोपाठ विक्रम गोखले देखील अभिनय क्षेत्रात आले. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध प्रकारांच्या मनोरंजनाच्या माध्यमात त्यांनी मुशाफिरी केली. त्यांचा आवाज ही त्यांची ओळख होती. त्यांनी मराठी नाटकांतून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर मराठी आणि पुढे हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नुकताच प्रदर्शित झालेला निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. याआधी ते सताड उघड्या डोळ्यांनी या वेबसीरिजमध्ये दिसले होते. ‘नटसम्राट’ मध्ये त्यांनी केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते.विक्रम गोखले यांना मनोरंजन विश्वातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. गोखले यांचे पार्थिव आज शनिवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर मध्ये अंत्यदर्शनासाठीठेवण्यात येईल. तर त्यानंतर काही वेळातच वैकुंठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.






















