महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (सातारा ) : राहुल ताटे – पाटील
कोरेगाव तालुक्यातील साप ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कर्मचारी जाकीर शिकलगार यांची मुलगी सानिया शिकलगार हिने एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. ती श्री सिद्धेश्वर विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी एनएमएमएस ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होते. सानिया शिकलगारचे वडील जाकीर शिकलगार हे गावात पाणी सोडण्याचे काम करतात. मुलीने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून वडिलांच्या कष्टाचे चीज केले, अशा शब्दात ग्रामस्थ सानियाचे कौतुक करत आहेत. तर माझ्या मुलीने परिस्थितीची जाण ठेवून शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. स्वता:च्या शिक्षणाची स्वतःच सोय केली. शासनानेही शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून गरीबांना शिक्षणाची कवाडे खुली केली, त्याबद्दल शासनाचे कौतुक करता येईल तेवढे कमीच असल्याचे जाकीर शिकलगार यांनी स्पष्ट केले.
या यशाबद्दल सानियाला तत्कालीन सरपंच शशिकला शेडगे, उपसरपंच नागेश अडसुळे, सदस्य चंद्रकांत जाधव, सचिन कदम, विकास कदम, उज्वला कदम, मनिषा कदम, कल्पना कदम, कांताबाई कांबळे, ग्रामसेवक संतोष पाटील, पोलीस पाटील वंदना भुजबळ, शाळेचे मुख्याध्यापक के.एन.जमदाडे, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.