फलटण दि. १९ : फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्राध्यान्याने कृषी, औद्योगिक विकासाला गती देत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र व राज्य शासन आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेले काम प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले आहे.
नाईकबोमवाडी, ता. फलटण येथे मंजूर असलेल्या औद्योगिक वसाहत नामफलक उभारणी व त्याचे अनावरण छ. शिवाजी महाराज जयंती आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समारंभ पूर्वक करण्यात आले. त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. यावेळी स्वराज पत संस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, सचिन अहिवळे, अशोकराव जाधव, राजेश शिंदे, अमोल सस्ते, लतीफ तांबोळी, रियाज इनामदार, बबलू मोमीन, राजेंद्र निंबाळकर, संजय गायकवाड, तानाजी करळे, सुरज तांदळे, रवि पवार, बापूराव चव्हाण, सरपंच दत्तात्रय चव्हाण, दयानंद घाडगे, बाबु जाधव, मंगेश चव्हाण, गणेश ढेंबरे, सोमनाथ चव्हाण, बाळासाहेब साळुंके आणि नाईकबोमवाडी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फलटण तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्टयात कृष्णेचे पाणी पोहोचवून तेथील शेतीला ऊर्जितावस्था आणि शेतकऱ्यांना समाधान देण्यासाठी नीरा – देवघर प्रकल्पाच्या कालव्यांसह त्यावरील नियोजित उपसा सिंचन योजना पूर्ण करणे आणि नाईकबोमवाडी, ता. फलटण येथील औद्योगिक वसाहतीची उभारणी याला प्राधान्य देवून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या एक दीड वर्षात केलेले प्रयत्न यशस्वी होत असून नीरा – देवघरच्या उर्वरित कामासह संपूर्ण प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता, सदर प्रकल्प ७५ % क्षमतेवर असल्याचे स्पष्ट झाल्याने आता प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून आज नामफलक उभारण्यात आला असल्याने भविष्यात येथील कृषी औद्योगिक विकास गती घेईल असा विश्वास जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
कृषी औद्योगिक विकासामुळे तरुणांना नोकरी आणि उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार असून नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहती मध्ये येथील तरुणांना छोटे प्रकल्प उभारुन तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देताना स्वतः उद्योजक बनण्याची, आपल्या कुटुंबाचा विकास साधण्याची संधी मिळणार आहे, त्याच बरोबर कृषी क्षेत्रात फळबाग व तत्सम पिके घेऊन येथे कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्याची संधी येथील शेतकरी तरुणांना लाभणार असल्याचे जयकुमार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रारंभी नामफलकाची उभारणी झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन श्रीफळ वाढविण्यात आले.