महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / म्हसवड :
माण तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. माण च्या ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, अद्ययावत व परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध होण्याकरिता माण तालुक्यात जिल्हा आरोग्य उप केंद्र सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक श्री गणेश काटकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे कि, माण तालुका जिल्हा आरोग्य केंद्रापासून शंभर किलोमीटर दूरवर आहे या ठिकाणी गंभीर रुग्णांना उपचाराची कोणतीही अद्ययावत सोयी उपलब्ध नाही . या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या कारणास्तव शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ सामान्य नागरिकांना घेता येत नाही. तसेच आरोग्य सेवा ही नागरिकांना परवडत नाही. परिणामी सातारा जिल्हा रुग्णालय दूर असल्याने रूग्णांचे दगावण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे. गंभीर, अती गंभीर रुग्णांना तातडीचीआरोग्य सुविधा तात्काळ मिळत नसल्याने सामान्य जनतेची ससेहोलपट होत आहे . माण तालुक्यामध्ये जिल्हा आरोग्य उप केंद्राची निर्मिती झाली तर त्याचा लाभ परिसरातील तालुक्यांना होणार असून रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पर्यंत जाण्यास जास्त वेळ लागत असल्याने रस्त्यातच मृत्यू पावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात दुष्काळ ग्रस्त नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक श्री. गणेश काटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






















